fbpx

Breking news – पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या

पुणे, दि. 19 – पुण्यातील सुखसागर नगर परिसरातील गल्ली क्रमांक एक येथे राहणाऱ्या कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. काल रात्री ही घटना घडली. यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. त्यांना मारून गळफास दिला असण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

अतुल दत्तात्रय शिंदे वय ३३ वर्ष, जया अतुल शिंदे वय ३२ वर्ष , ऋग्वेद अतुल शिंदे वय ६ वर्ष आणि अंतरा अतुल शिंदे वय ३ वर्ष अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या चौघांचे मृतदेह घरात लटकलेल्या स्थितीमध्ये आढळून आले. गेल्या दोन दिवसांपासून शिंदे कुटुंबीयांनी घर उघडलं नव्हतं. त्यांचा कुणात वावरही नव्हता आणि काहीही हालचाली दिसून येत नव्हत्या. शिवाय या कुटुंबातील कुणीही फोन उचलत नव्हते आणि व्हॉट्सअॅपलाही प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे संशय आल्याने शेजाऱ्यांनी काल रात्री पोलिसांना फोन करून कळवले. भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शिंदे कुटुंबीयांना बराच वेळ आवाज देऊनही दरवाजा उघडला जात नसल्याने पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश करताच त्यांना समोरच या चौघांचेही लटकलेले मृतदेह दिसले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पंचनामा केला असून आजूबाजूला चौकशी सुरू केली आहे.
‘या’ आजारांमुळेही वाढला करोना मृतांचा आकडा
अतुल शिंदे हे या कुटुंबातील प्रमुख आहेत. ते शाळेतील मुलांचे आयकार्ड बनवण्याचे काम करत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा बिजनेस बंद होता. त्यामुळे त्याने आर्थिक अडचणीतून आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याच्या जवळ काही सुसाईड नोट अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शिंदे कुटुंबीयांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास केला जात आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षण वसंत कुंवर यांनी दिली. शिंदे कुटुंबीयांच्या मोबाइल फोनचे कॉल रेकॉर्ड्स तपासले जात असून त्यांनी शेवटचा कॉल आणि मेसेज कुणाला केला होता, याचीही तपासणी केली जात आहे. तसेच शेजाऱ्यांपैकी शिंदे कुटुंबीयांशी शेवटचं कुणी बोललं होतं का? याचाही शोध घेतला जात असून या कुटुंबीयांच्या आत्महत्येच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, शिंदे कुटुंबीयांच्या नातेवाईकांशी पोलिसांनी संपर्क साधला असून त्यांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पाचारण करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Leave a Reply

%d bloggers like this: