fbpx

ज्येष्ठ दिग्दर्शक कांचन नायक यांचे निधन

पुणे, दि. १५ – आपल्या दिग्दर्शिय पदार्पणातच राष्ट्रीय पारितोषिक पटकवणारे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक कांचन नायक (६६) यांचे अल्प आजाराने निधन झाले. गेल्या तीन दशकांहूनही अधिक काळ कार्यरत राहत चित्रपट, लघुपट व टीव्ही या तिन्ही माध्यमातून त्यांनी आपली एक स्वतंत्र मुद्रा निर्माण केली होती. परिवारात त्यांच्या मागे त्यांची पत्नी आहे.

‘कळत नकळत’ या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच चित्रपटाने ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट’ या सन्मानासह चार राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावे केले होते. याच चित्रपटाने तब्बल नऊ राज्य चित्रपट पुरस्कार जिंकून जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर ‘राजू’ पासून काहीच वर्षांपूर्वी आलेल्या ‘दणक्यावर दणका’ या चित्रपटापर्यंतच्या तीस वर्षांहूनहीअधिकच्या वाटचालीत अनेकविध चित्रपट दिग्दर्शित केले. आताही एका नवीन चित्रपटाचे काम नुकतेच त्यांनी संपवीत आणले होते.
डी. रामानायडू या दक्षिणेकडील दिगग्ज निर्मात्यासाठी ‘माझी आई’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. ‘पिंजडेवाली मुनिया’ या चित्रपटाने त्यांनी भोजपुरी चित्रपट सृष्टीतही हजेरी लावली. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपटाचे ते सहदिग्दर्शक होते.
निळू फुलेंची प्रमुख भूमिका असलेल्या व वि. वा. शिरवाडकरांच्या कथेवरून केलेल्या त्यांच्या ‘विश्वनाथ एक शिंपी’ या लघुपटाला सहाव्या आशियायी चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार लाभला होता. ‘यशवंतराव चव्हाण’ आणि ‘शोभना समर्थ’ या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या डॉक्युड्रामांची देखील जाणकारांकडून मोठी प्रशंसा झाली.
‘इंद्रधनुष्य’, ‘बंधन’, ‘अपूर्ण मी तुझ्याविना’, ‘महासंग्राम’ या त्यांच्या टीव्ही मालिकांना प्रेक्षकांनी पसंतीने चांगलाच प्रतिसाद दिला होता.
महाराष्ट्र शासनाच्या चित्रपट अनुदान समितीचे व पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपट निवड समितीचे ते सदस्य होते. राष्ट्रीय पुरस्कारांपासून अनेक चित्रपट पुरस्कारांच्या परीक्षण समितीत सातत्याने त्यांचा सहभाग असे.

Leave a Reply

%d bloggers like this: