हेलीकॉप्टरद्वारे पादुका जाणार संत जनाबाई, मोतीराम महाराजांची पादुका पालखी
गंगाखेड,दि.12 – कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी रद्द झाली खरी. परंतू मानाच्या पाच पालख्यांना राज्य सरकारने हेलीकॉप्टरने पंढरपूरला पाठवण्याचा निर्णय घेतला. याच धर्तीवर गंगाखेडची संत जनाबाई आणि पालम तालुक्यातील फळा येथील संत मोतीराम महाराज पालखीसही हेलीकॉप्टरने पंढरपूरला जाण्यास राज्य सरकारने परवानगी बहाल केली असल्याची माहिती गंगाखेड तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी दिली.
दरम्यान, 30 जून रोजी फळा हद्दीतील सर्व्हे नं 10/2 येथील तात्पुरत्या हेलीपॅड वरून तसेच गंगाखेड येथील गोल्डन ड्रीम इंग्लीशस्कुलच्या बाजुच्या कोद्रीरस्त्यावरील यज्ञभूमी परिसरातील संभावीत हेलीपॅडवरून या पादुका रवाना करण्या संदर्भात नाहरकत प्रमाणपत्रासह अन्य कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती यादव यांनी दिली.
तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद यादव, जनाबाई संस्थानचे अध्यक्ष अॅड संतोष मुंडे यांनी या संदर्भात संस्थान आणि वारक-यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तपशीलवार निवेदन पाठविले होते.त्यात म्हटले की, शासन मानाच्या पाच पालख्या विशेष व्यवस्था करून पंढरपूरला जाणार आहेत. परंतू वारकरी सांप्रदायात अतिशय उच्चस्थान आणि अधिकार असलेल्या गंगाखेडच्या संत जनाबाई आणि महाराष्ट्रातील वारकर्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संत मोतीराम महाराज यांच्या पादुकाही पंढरपूरला जाव्यात, ही भाविकांची भावना आहे. यासाठी विशेष बाब म्हणून हेलीकॉप्टरची परवानगी द्यावी. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दखल घेवून हेलीकॉप्टरद्वारे पादुका पंढरपुरला नेण्यासाठी परवानगी बहाल केली असून जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी त्या संबंधीचे पत्र दिले असून त्यात काही अटी व शर्थी आहेत. विशेषत पाच व्यक्तींनाच हेलीकॉप्टरद्वारे जाता येईल असे म्हटले आहे. 30 जून रोजी या दोन्ही संस्थानच्या वतीने पादुका पालखी एकाच हेलीकॉप्टरकडे पंढरपूरकडे प्रस्थान करतील, अशी माहिती गोविंद यादव यांनी दिली.