fbpx
Monday, September 25, 2023
PUNE

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये आरोग्य तपासणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व आवश्यकतेप्रमाणे क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा

महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांनी घेतला पुणे जिल्ह्याचा आढावा

पुणे, दि. 3 – महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांनी पुणे जिल्ह्याचा आढावा घेतला. पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रनिहाय कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच आरोग्य तपासणीबाबत तातडीने सर्वेक्षण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व आवश्यकतेप्रमाणे क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा, तसेच प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांनी केल्या आहेत.

महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांनी पुणे शहरासोबतच पुणे विभागातील कोरोना प्रतिबंधाबाबतचा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे आदींसह  विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव करीर म्हणाले, पावसाळ्यात विविध प्रकारचे आजार वाढण्याची शक्यता असते. या आजारांची आणि कोविड १९ ची लक्षणे सारखी असल्याने जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. महागनरपालिका आणि शासनाची रुग्णालये ही कोविड १९ साठी रुग्णालये म्हणून राखून ठेवण्यात आलेली असल्याने पावसाळ्यातील आजारासंदर्भात खाजगी रुग्णालयांची भूमिका जास्त महत्त्वाची असून पावसाळ्याच्या काळात रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन कोरोनासाठी निर्माण करण्यात आलेल्या तीन स्तरावरील रुग्णालयीन व्यवस्थेत आवश्यकतेनुसार खाटांची क्षमता निर्माण करण्यावर भर देण्याचे निर्देशही करीर यांनी दिले. यासोबतच स्त्राव तपासणी क्षमता, दिवसनिहाय पॉझिटिव्ह रुग्णसंख्या, वॉर्डनिहाय रुग्णसंख्या, सुलभ नियोजनासाठी मायक्रो कंन्टेनमेंट झोन, संस्थात्मक क्वारंटाईन क्षमता, जेष्ठ नागरिकांची तपासणी, शाळा सुरू करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी तसेच सुरू झाल्यानंतरची काळजी, उपचार सुविधा आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच सर्व मिळून कोरोनाचे हे संकट निश्चितपणे दूर करू, असा विश्वासही श्री.करीर यांनी व्यक्त केला.

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोना प्रतिबंधासाठी पुणे शहरासह पुणे विभागातील पाचही जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्णसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय तयार होणाऱ्या नवीन हॉटस्पॉटवर देखील लक्ष देण्यात येत आहे. परराज्य व परजिल्ह्यातून प्रवास करुन आलेल्या तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक व श्वसनाशी संबंधित आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह असणारे नागरिक, गरोदर महिला, लहान बालके यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. तसेच त्यांच्यात कोरोना सदृश लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत असल्याचे सांगून पुणे शहरासह विभागात सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, कोरोना प्रतिबंधासाठी सर्व आघाड्यांवर प्रशासन प्रयत्नशील आहे. पावसाळ्याच्या कालावधीत कोरोना संसर्गाबरोबरच अन्य आजाराच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होऊ नये, यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. झोपडपट्टी व प्रतिबंधित क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीवर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील कोरोना नियंत्रणासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी कोरोनाबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: