धारावीतील ऑक्सिजन सुविधायुक्त २०० खाटांचे विशेष रुग्णालय
मुंबई, दि. १ : मुंबईतल्या घनदाट लोकवस्तीचा भाग असलेल्या धारावी येथील महाराष्ट्र नेचर पार्कजवळ ऑक्सिजन सुविधायुक्त २०० खाटांचे कोरोना रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाला आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली. अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत हे रुग्णालय उभे राहिल्यामुळे या भागातील रुग्णांना आहे तेथेच उपचाराची सुविधा मिळणार आहे. उद्यापासून हे रुग्णालय कार्यान्वित होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे बऱ्याचदा श्वास रोखण्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागते अशा वेळी या रुग्णांना वेळीच ऑक्सिजनचा पुरवठा झाला तर त्यांचे प्राण वाचू शकतात. स्थानिकांना आहे त्या भागातच उपचाराची सोय व्हावी यासाठी मुंबई महापालिकेमार्फत धारावीतील बस डेपो जवळ हे कोरोना आरोग्य सेंटर सुरू करण्यात आले आहे. केवळ १५ दिवसांमध्ये २०० खाटांच्या या रुग्णालयाची उभारणी झाली असून तेथे प्रत्येक बेडला ऑक्सिजनची सोय आहे. त्यामुळे ज्या कोरोनाबाधित रुग्णाला श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागला त्याला तत्काळ या सेंटरमध्ये आणून ऑक्सिजन देऊन उपचार केले जातील.
या रुग्णालयासाठी १० डॉक्टर्स, १५ नर्स, वॉर्डबॉय तसेच पूर्णवेळ रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या रुग्णालात सीसीटीव्ही यंत्रणा देखील बसविण्यात आली आहे. त्याचबरोबर थर्मल सेंसर यंत्रणा देखील असून त्याद्वारे तापाच्या रुग्णांची वेळीच तपासणी होणे शक्य होईल. कोरोनाशिवाय अन्य संशयित रुग्णांवर याठिकाणी मोफत उपचार करण्यात येतील.
आज आरोग्यमंत्र्यांनी या रुग्णालयाला भेट देऊन त्याची पाहणी केली. अल्पावधित रुग्णालय उभे राहिले याबद्दल त्यांनी यंत्रणेनेचे कौतुकही केले. यावेळी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आदी उपस्थित होते. श्री. दिघावकर यांनी रुग्णालयाबाबत आरोग्मयंत्र्यांना माहिती दिली.
Share this:
- Click to share on Twitter (Opens in new window)
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- Click to share on LinkedIn (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to email a link to a friend (Opens in new window)
- Click to print (Opens in new window)