#MissionBeginAgain महाराष्ट्रातील लॉकडाऊन संदर्भात आदेश जारी
मुंबई, दि. 31 – देशासह राज्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने लाॅकडाऊनचा कालावधी 1 जून ते 30 जून पर्यंत वाढवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने परत एकदा राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला असून 1 जून ते 30 जून पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम राहणार आहे. राज्यात लॉकडाऊन वाढण्याचे स्पष्ट संकेत मिळत होते आणि तसेच झाले आहे. राज्यात कोरोना संकट गंभीर झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढणार हे निश्चित होते.

मात्र नवीन लाँकडाऊनच्या नियमानुसार नागरिकांना मोठ्या प्रमाणात व्यवहारांना मुभा व सवलती देण्यात आल्या आहेत. कोणत्या सवलती देण्यात आल्या हे पाहूया
केंद्राप्रमाणे महाराष्ट्राने लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढवला आहे. या लॉकडाऊनमध्ये टप्प्या-टप्प्याने शिथिलता देण्यात आली आहे. ३ जून, ५ जून आणि ८ जूनपासून वेगवेगळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत
३ जूनपासून लागू होणारे नियम-
या लॉकडाऊनमध्ये कंटेंन्मेंमट झोनमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही. मुंबई आणि एमएमआर रिजनमधील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सुट देण्यात आली आहे.
यात सकाळी ५ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. ग्रुपने एकत्र जमा होण्यास बंदी असणार आहे. शारीरिक कसरतीसाठी काही वेळ बाहेर पडण्यास परवानगी, यासाठी जवळच्या मोकळ्या जागांचा वापर करता येणार, मात्र दूर जाण्यास मनाई आहे. सायकलिंगची परवानगीही देण्यात आली आहे.सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के उपस्थितीस परवानगी, आधी ही उपस्थिती ५ टक्के इतकी होती.
५ जूनपासून लागू होणारे नियम –
मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळून सर्व मार्केट, दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी, यासाठी सम आणि विषम फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. सम तारखेला एका रस्त्यावरील दुकाने तर विषम तारखेला समोरच्या रस्त्यावरील दुकाने खुली राहणार आहेत.
कपड्याच्या दुकानातील चेंजिंग आणि ट्रायल रुम बंद राहणार, दुकानात गर्दी होणार नाही याची खबरदारी दुकानदाराने घ्यायची आहे. यासाठी टोकन पद्धत, होम डिलिव्हरीसारखे पर्याय वापरायचे सांगण्यात आले आहे.
८ जूनपासून लागू होणारे नियम –
८ जूनपासून सर्व खाजगी कार्यालयांमध्ये १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत चालविण्यास परवानगी, उरलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय, कामाच्या ठिकाणी सर्व खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
राज्याबाहेर जाण्यासाठी किंवा आपल्या राज्यात येण्यासाठी परवानगीची गरज लागणार, राज्यांतर्गत एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात अथवा दुस-या शहरात प्रवासासाठीही परवानगीची गरज लागणार आहे.
संपूर्ण राज्यात खालील बाबींवर बंदी कायम –
शाळा, कॉलेज, शैक्षणिक ट्रेनिंग सेंटर, कोचिंग क्लासेस बंद राहणार
आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार
मेट्रो, लोकलसेवा बंद राहणार
स्विमिंग पूल, जिम, सिनेमागृह, धार्मिक स्थळे, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार