स्वप्नांचा अंत सर्वाधिक वाईट असतो, अशी पोस्ट प्रेक्षाने मृत्यूपूर्वी टाकली होती.यावरून ती कुठल्या अवस्थेतून जात होती याची कल्पना आपण करू शकतो. आता प्रेक्षाने मृत्यूपूर्वी लिहिलेली सूसाईड नोटही सापडली आहे. हिरा नगर पोलिसांनी टाइम्स आॅफ इंडियासोबत ही प्रेक्षाने लिहिलेली ही सूसाइड नोट शेअर केली आहे.
या सूसाइड नोटमध्ये प्रेक्षाने तिच्या मृत्यूसाठी कुणीही जबाबदार नसल्याचे म्हटले आहे. ‘माझ्या भंगलेल्या स्वप्नांनी माझा विश्वासही तोडला. मी मृत स्वप्नांसोबत जगू शकत नाही. या नैराश्यासह जगणे कठीण आहे. गेल्या वर्षभरात मी खूप प्रयत्न केलेत. पण आता मी थकलीय,’ असे प्रेक्षाने यात लिहिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काम न मिळाल्यामुळे प्रेक्षा तणावात होती. डिप्रेशनमध्ये होती. यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
कुटुंब पत्ते खेळत होते, प्रेक्षा गुपचूप बसली होती
प्रेक्षाच्या घराशेजारी राहणा-या तिच्या कझिनने सांगितल्यानुसार, प्रेक्षा खूप चंचल मुलगी होती. पण गेल्या काही दिवसांपासून अचानक ती कधी नव्हे इतकी शांत झाली होती. आत्महत्येच्या आदल्या रात्री प्रेक्षाचे सगळे कुटुंब पत्ते खेळत होते. पण प्रेक्षा एकटी पाय-यांवर शांत बसली होती. तिच्या आईने तिच्या जवळ जात तिची चौकशीही केली होती. पण मी ठीक आहे, असे म्हणून प्रेक्षाने वेळ मारून नेली होती. यानंतर रात्री 10 वाजता प्रेक्षा तिच्या खोलीत गेली आणि इन्स्टावर तिने एक पोस्ट टाकली. सकाळी तिची आई तिला उठवायला गेली असता दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडला असता प्रेक्षा सिलींग फॅनला गळफास लावलेल्या अवस्थेत त्यांना दिसली.