जगभरातील एक कोटी मराठी भाषिकांचा जागतिक कोविड – १९ महाजागर
पुणे, दि. 24 – कोविड -१९ या महामारीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील ४२ देशातून, अमेरिकेतील २१ राज्यातून आणि महाराष्ट्रासह भारतातील १२ राज्यातून एकाचवेळी अनेक मराठी भाषिक एकत्र येत असून २५ मे, २०२० रोजी ते समूह माध्यमावर कोविड – १९ संबंधाने महाजागर करणार आहेत. विश्व मराठी परिषदेच्या वतीने या अभिनव उपक्रमाचे नेतृत्व बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिकेच्या अध्यक्ष विद्या जोशी ह्या करणार असून बृहन महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०२१ शार्लेट अमेरिकाचे मुख्य संयोजक आणि गर्जा मराठीचे संस्थापक सदस्य संदीप पाध्ये, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील तसेच जगभरातील अनेक देशातील आणि भारतातील अनेक राज्यातील महाराष्ट्र मंडळांचे आजी माजी पदाधिकारी या उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत.

कोविड – १९ विषयी मानसिक आणि भावनिक आरोग्याबरोबर शैक्षणिक जागृती असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. २५ मे रोजी हा जागृती संदेश ४२देश, अमेरिकेतील विविध राज्ये. भारतातील विविध राज्ये आणि महाराष्ट्रातील विविध शहरांमधून एकाच दिवशी लाखो लोक शेअर करतील आणि त्यापुढील ७२ तासात तो जगभर मोठ्या प्रमाणावर पाठवला जाईल. किमान एक कोटी मराठी भाषिकांनी या महाजागरामध्ये सहभागी व्हावे या पद्धतीने जगभरातील विश्व मराठी परिषदेचे समन्वयक प्रयत्न करीत आहेत.
जग सध्या एका अनाकलनीय, भीषण आणि भयकंपित अशा परिस्थितीतून जात आहे. जगभरातील मराठी भाषिक याप्रसंगी एकत्र असून ते परस्परांना आधार देत जागृती निर्माण करणार आहेत, अनुभवांची देवाणघेवाण करणार आहेत. सध्याही ते गप्पा मारीत आहेत, लिखाण करीत आहेत, कविता लिहित आहेत, सृजनशील निर्मिती करीत आहेत, आपल्या भावनांना वाट करून देत आहेत, मन मोकळ करीत आहेत आणि धीराने या महाभयंकर संकटाचा सामना करीत आहेत. मुख्य म्हणजे हे सर्वजण सर्वसामान्य मराठी लोक आहेत. यात कोणी सेलिब्रिटी अथवा राजकारणी नाही. सामान्य माणसांनी एकत्र येऊन एकमेकांना दिलेला मानसिक आणि भावनिक आधार असे या महाजागराचे स्वरूप आहे.
कोविड – १९ महामारीविरोधी लढताना शारिरीक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य सुदृढ़ राखणे आवश्यक आहे. अशा वेळी जगभरातील मराठी भाषिकाचे ऐक्य, बंधुभाव आणि संवाद यांचा हा अभूतपूर्व अविष्कार असेल. विशेष म्हणजे या उपक्रमाद्वारे कोविड – १९ काळातील जगभरातील मराठी बांधवांच्या संवादाचे एक महत्त्वपूर्ण असे दस्तावेजीकरणही होईल. शारिरीक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य, जागृती, दस्तावेजीकरण, सृजनशील कल्पनांचा अविष्कार आणि विश्वसंवाद असे या उपक्रमाचे अपेक्षित फलित आहे, असे प्रतिपादन विश्व मराठी परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले आहे.
एखाद्या भाषिक समूहाने एकत्र येऊन अशा प्रकारे संवेदनशीलतेचा आणि एकत्वाचा एकाचवेळी महाजागर करायचा आणि सामुहिक मानसिक, भावनिकतेला बळ द्यायचे ही जगातील वेगळीच घटना असेल.

जगजगभरातील विविध देशातील महाराष्ट्र मंडळे, सांस्कृतिक मंडळे, मराठी संस्था, मराठीभाषा आणि संस्कृतीसंवर्धन संस्था, मराठीकट्टे, इ. या उपक्रमात सहभागी होत आहेत. अमेरिकेतील आर्सि फाऊंडेशन यासाठी विशेष सहाय्य करीत आहे. या महाजागरामध्ये सहभागी होण्यासाठी www.vishwamarathiparishad.org या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि ७०६६२५१२६२ या परिषदेच्या व्हॉट्सअप क्रमांकाला संपर्क करावा. या महाजागराचा व्हिडिओ विश्व मराठी वाणी या युट्युब चॅनेल वर प्रसिद्ध झाला आहे. युट्युबवर #Covid19Jagar असे सर्च करुन हा व्हिडिओ पाहता येईल.
देशविदेशातील अधिकाधिक मराठी भाषिकांनी या महाजागरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन विश्व मराठी परिषदेच्यावतीने प्रा. क्षितिज पाटुकले आणि अनिल कुलकर्णी यांनी केले आहे.