Thursday, June 11, 2026
PUNE

येरवड्यातील ऐतिहासिक शेतकरी दाम्पत्याच्या पुतळा स्थलांतराला स्थानिकांचा विरोध, पुतळा चुकीच्या पद्धतीने हटवल्या प्रकरणी कारवाईची मागणी. 

पुणे – जुन्या पुण्याची ओळख म्हणून येरवड्याच्या प्रवेशद्वारावर मुख्य पर्णकुटी चौकातील ऐतिहासिक शेतकरी दाम्पत्याचा पुतळा महामेट्रोच्या कामासाठी सोमवारी सायंकाळी उतरवण्यात आला. या ऐतिहासिक पुतळ्याच्या स्थलांतरणात महामेट्रो कडून शिल्पाचे नुकसान झाले आहे. पुतळा स्थलांतर करण्यासाठी योग्य ती काळजी न घेतल्याचा आरोप येरवडा नागरी कृती समिती व समस्त गावकरी मंडळ येरवडा यांच्या वतीने करण्यात आला आहे. त्यासाठी जबाबदार महामेट्रोवर कारवाईची मागणी महापौर, स्थानिक आमदार व महापालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.
महामेट्रो च्या वतीने नवीन बंडगार्डन पुलाकडून येरवडयाच्या दिशेने मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रो मार्गात येणारा ऐतिहासिक शेतकरी दाम्पत्याचा पुतळा स्थलांतरित करण्याची परवानगी पथ विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी महामेट्रोला महापालिका आयुक्तांच्या आदेशाने नियम व अटीसह
दिली आहे. मात्र पुतळा स्थलांतरित करताना शिल्पास कोणतीही इजा होणार नाही, त्याचे मूळ स्वरूप अबाधित राहील. तसेच पोलीस व वाहतूक विभागासह इतर आवश्यक परवानगी घेऊनच पुतळा स्थलांतरित करावा. स्थलांतर करताना दुर्दैवाने नुकसान झाल्यास तसेच संपूर्ण पुतळ्याच्या पुनर्वसनाचा खर्च याची जबाबदारी महामेट्रो वर टाकण्यात आलेली आहे.सोमवारी दुपारी सदरचा पुतळा स्थलांतर करण्याचे काम महामेट्रोच्यावतीने सुरू करण्यात आले होते. यावेळी महापालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या अटी शर्ती चे पालन झाले नाही. तसेच मूळ शिल्पाचे नुकसान देखील झालेले आहे. स्थलांतर करताना महापालिका पथ विभाग अथवा क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता. विशेष म्हणजे येरवडा पोलिसांना देखील पुतळा स्थलांतरित करणार असल्याची माहिती देण्यात आलेली नव्हती. एकंदरीतच महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे महामेट्रोने पुतळा स्थलांतराचा कारभार मनमानी करत केला खरा, मात्र त्यात नियम धाब्यावर बसवत मूळ शिल्पाचे नुकसान झाल्यामुळे समस्त गावकरी मंडळासह स्थानिक नागरिक यांच्या रोषाला महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले. येरवडा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहाय्यक निरीक्षक समीर करपे, उपनिरीक्षक हनुमंत भोसले यांनी स्थानिक ग्रामस्थ व महामेट्रो अधिकाऱ्यांमध्ये चर्चा घडवून आणली. येरवडा नागरी कृती समिती व समस्त गावकरी मंडळ यांच्यावतीने संबंधित ऐतिहासिक पुतळा सुस्थित योग्य ठिकाणी बसवण्यात यावा अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात दिरंगाई करणाऱ्या महापालिका तसेच महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी येरवडा कृती समितीचे निखिल गायकवाड, शैलेश राजगुरू, रुपेश घोलप, धनंजय बाराथे, सुहास कांबळे, समीर शेख, सुदर्शन चखाले यांच्यासह समस्त गावकरी मंडळाचे बलभीम राजगुरू,सुहास राजगुरु, दत्तात्रय शिवरकर, शंकर मोझे,मनसेचे विधानसभा अध्यक्ष सुनील कदम, मनोज ठोकळ, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत तावरे, एजाज खान, विजय घेनंद, सचिन रणपिसे तसेच स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading