स्वान फाऊंडेशनचे अध्यक्ष शशिकांत कांबळे यांना संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी निमंत्रण
बँकॉक, कतार, केनिया आणि सिंगापूरनंतर आता जिनिव्हात भारताचे प्रतिनिधित्व; मानवाधिकार आणि पर्यावरण विषयावर मांडणार विचार
पुणे, दि. १७ : स्वान फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि भारती विद्यापीठाचे माजी जनसंपर्क अधिकारी शशिकांत कांबळे यांना स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे आयोजित करण्यात येणाऱ्या १५ व्या संयुक्त राष्ट्र व्यवसाय आणि मानवाधिकार मंचासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. येत्या २३ ते २५ नोव्हेंबरदरम्यान जिनिव्हा येथील पॅलेस डेस नेशन्समध्ये ही परिषद होणार असून, या जागतिक व्यासपीठावर कांबळे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
कांबळे यांना यापूर्वीही संयुक्त राष्ट्रांच्या विविध परिषदांसाठी निमंत्रित करण्यात आले होते. बँकॉक, कतार, केनिया आणि सिंगापूर येथे झालेल्या परिषदांमध्ये त्यांनी भारत आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. आता जिनिव्हा येथील परिषदेसाठी मिळालेले निमंत्रण त्यांच्या आंतरराष्ट्रीय कार्याचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
कांबळे यांनी भारती विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करताना विद्यापीठ, विद्यार्थी, शिक्षक आणि समाज यांच्यात समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यानंतर त्यांनी स्वान फाऊंडेशनची स्थापना करून शिक्षण, संस्कृती आणि नेतृत्व विकासाच्या क्षेत्रात विविध उपक्रम राबविले.
ज्ञानेश्वरीला ७५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वान फाऊंडेशनच्या माध्यमातून मॉरिशसमध्ये ‘मोगरा फुलला’ हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमातून महाराष्ट्राची संतपरंपरा आणि ज्ञानेश्वरीतील विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कांबळे यांनी सुरू केलेला ‘नॉलेज नेस्ट’ हा उपक्रमही विशेष लक्षवेधी ठरला आहे. इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा (NASA), अलाबामा आणि सिंगापूर येथे शैक्षणिक भेटीची संधी उपलब्ध करून देण्यात आली. सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही जागतिक स्तरावरील शैक्षणिक अनुभव मिळावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
जिनिव्हा येथे होणाऱ्या परिषदेत कांबळे हे ‘मानवाधिकार आणि पर्यावरण’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. त्याचबरोबर शाश्वत विकास उद्दिष्टांमधील उत्तम आरोग्य व कल्याण, सन्मानजनक रोजगार व आर्थिक विकास, उद्योग-नवोन्मेष व पायाभूत सुविधा आणि उद्दिष्टपूर्तीसाठी जागतिक भागीदारी या विषयांवर आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाच्या (OHCHR) वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या मंचात जगभरातील सरकारे, उद्योग क्षेत्र, नागरी समाज, समुदाय संघटना, कामगार संघटना, गुंतवणूकदार, कायदेतज्ज्ञ, शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांचा सहभाग असणार आहे.
‘भारती विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करताना संवादाचे महत्त्व शिकलो. बँकॉक, कतार आणि सिंगापूर येथे भारताचे प्रतिनिधित्व केले. मॉरिशसमध्ये ‘मोगरा फुलला’ या कार्यक्रमातून ज्ञानेश्वरीचा विचार जगभर पोहोचविण्याचा प्रयत्न केला. नॉलेज नेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नासापर्यंत घेऊन जाण्याचे स्वप्न साकार केले. आता जिनिव्हामध्ये भारताचा आणि शिक्षकांचा आवाज जागतिक व्यासपीठावर मांडण्याची संधी मिळत आहे. हे निमंत्रण माझे एकट्याचे नसून महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याचे आहे,’ अशी भावना शशिकांत कांबळे यांनी व्यक्त केली.
