भारतीय जनता पक्ष काँग्रेसची कॉपी करत आहे – रोहित पवार
अमरावती : काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमांसारखेच कार्यक्रम आयोजित करून भारतीय जनता पक्ष काँग्रेसची कॉपी करत आहे काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज या कार्यक्रमापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपूर येथे तरुणाईच. या कार्यक्रमावरून रोहित पवार यांनी फडणवीस व भाजप यांच्यावर टीका केली आहे.
राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला पैसे देऊन प्रेक्षक आणि समाज माध्यमातील इन्फ्लुएन्सर्स यांना बोलावण्यात आल्याची टीका भाजपाने केली होती. त्यावरही रोहित पवार यांनी पलटवार केला. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला आलेले लोक स्वयंस्फूर्तीने आले होते तर फडणवीस याच्या कार्यक्रमाला लोक गोळा करून आणले होते, असा दावा रोहित पवार यांनी केला.
.
फडणवीस यांच्या कार्यक्रमाला 4000 ढोल वादक होते. विविध स्पर्धांमधील स्पर्धक आणि विजेते बक्षीस घेण्यासाठी आले होते. सेलिब्रिटी क्रिकेटपटू तिलक वर्मा याला देखील या कार्यक्रमात पाचारण करण्यात आले. त्याला बघण्यासाठी ही अनेक जण आली असतील. अशाप्रकारे फडणवीस यांनी कार्यक्रमात कार्यक्रम उरकून घेण्याचा प्रकार केला, असेही रोहित पवार म्हणाले.
फडणवीस यांच्या कार्यक्रमात उपस्थित यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. कारण तसे करणे फडणवीस यांच्यासाठी अडचणीचे ठरले असते. खुद्द फडणवीस यांच्या नागपुरात गेल्या तीन महिन्यात 32 खून पडले. मग मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून तुम्ही काय करत आहात, असा सवाल उपस्थित त्यांनी केला असता तर तुमच्याकडे काय उत्तर होते, असा सवालही रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केला.
पुण्यात काँग्रेसने आयोजित केलेल्या राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाचे फलक रोहित पवार यांच्याकडून लावण्यात आले, याबाबत विचारले असता रोहित पवार यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले. आम्ही महाविकास आघाडी काँग्रेस बरोबर आहोत. खुद्द शरद पवार यांनी राजकारणाची सुरुवात काँग्रेस मधून केली. आम्ही समविचारी आहोत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाचे फलक लावणे यात आपण कोणतीही चूक केली नाही, असे रोहित पवार म्हणाले.
