पुणेकर रसिकांना मिळाली दुपारच्या रागांची पर्वणी
पुणे : शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम बहुतेक वेळा संध्याकाळी होत असल्यामुळे रसिकांना क्वचितच दुपारच्या रागांचा आनंद घेता येतो. ही बाब ओळखून आसमंत बेनेवोलन्स फाऊन्डेशनने दुपारच्या रागांवर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रसिद्ध शास्त्रीय गायक ओंकारनाथ हवालदार यांनी यावेळी दुपारी गायल्या जाणाऱ्या सारंग रागाचे विविध प्रकार सादर करून रसिकांना दुपारच्या रागांची अनोखी मैफल अनुभवण्याची संधी दिली.
विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी युवा गायक मेहेर परळीकर यांनी मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा तानपुरा उपलब्ध करून दिला होता.
कार्यक्रमाची सुरुवात राग वृंदावनी सारंगने झाली. यामध्ये झपतालातील बडा ख्याल तुम रब तुम साहेब, त्यानंतर मध्य लय तीनताल आणि द्रुत लय तीनतालातील रचना सादर करण्यात आल्या. ‘मधुर धुन बाजे, बाजे रे कित’ आणि ‘जाऊं मैं तो पे बलिहारी’ या बंदिशी ओंकारनाथ हवालदार यांनी गायल्या.
दुसऱ्या सत्रात राग मधमाद सारंगमधील मध्यलयीतील तीनतालातील ‘रंग दे, रंग रेजवा’ तसेच शुद्ध सारंगमधील तीनतालातील ख्याल ‘अब मोरी बात मान ले, या रचना सादर करण्यात आल्या. त्यानंतर सारंगचे अन्य प्रकार लंका दहन सारंग आणि गौड सारंग रसिकांना ऐकवण्यात आले. माझे माहेर पंढरी या लोकप्रिय मराठी भजनासोबत त्याचा कन्नड भावानुवादही हवालदारांनी सादर केला आणि या सुरेल मैफलीची सांगता मन प्रसन्न करणाऱ्या भैरवीने केली.
या कार्यक्रमात तबल्यावर प्रसिद्ध तबलावादक रामदास पळसुले, तानपुर्यावर समीर कुलकर्णी आणि वेद मुळे, तर संवादिनीवर समीर हवालदार यांनी साथसंगत केली.
या कार्यक्रमात आसमंत बेनेवोलन्स फाऊन्डेशनचे नंदकुमार पटवर्धन, नितीन करमरकर व पुरुषोत्तम पेंडसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुहिता खेर यांनी केले.
