Tuesday, August 25, 2026
Latest NewsPUNE

आवडत्या पात्रातून संस्कारांची गोष्ट; पुण्यात बोनोबोनोचा अनोखा प्रयोग

पुणे : डोरेमॉन, शिनचान, मोटू-पतलू यांसारखी कार्टून पात्रे मुलांच्या जगाचा अविभाज्य भाग झाली आहेत. आता जपानमधील ‘बोनोबोनो’ हे निरागस आणि आपुलकीचे पात्र भारतीय मुलांच्या भेटीला आले आहे. मात्र, त्याची ओळख केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न ठेवता, स्वच्छता, संवेदनशीलता, मैत्री, शिस्त, इतरांचा विचार आणि सार्वजनिक जबाबदारी यांसारखी मूल्ये मुलांपर्यंत सहज पोहोचवण्याचा अनोखा प्रयोग पुण्यात करण्यात आला.

शिवाजीनगर येथील भालेराव टॉवर येथे आयोजित विशेष कौटुंबिक कार्यक्रमाला १०० हून अधिक पालक, मुले तसेच भारत-जपान क्षेत्राशी जोडलेले नागरिक सहभागी झाले. विविध खेळ, संवादात्मक उपक्रम, जपानी संस्कृतीची ओळख आणि छायाचित्रण उपक्रमांमुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

एफटीबी कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामागे जपानमधील उत्तम कथा, पात्रे आणि सकारात्मक सांस्कृतिक मूल्ये भारतीय मुलांपर्यंत त्यांच्या परिचित भाषेत पोहोचवण्याचा व्यापक विचार आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना आणि नियोजन शर्वरी शिराळकर यांनी केले. त्या म्हणाल्या, “मुलांना उपदेश करण्याऐवजी त्यांच्या आवडत्या पात्राच्या कृतीतून चांगल्या सवयी, संवेदनशीलता आणि जबाबदारी समजली, तर ती मूल्ये त्यांच्या मनात अधिक सहज रुजू शकतात. आज मुलांना आवडणारी पात्रे उद्या ते कसे नागरिक बनतील, यावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतात का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.”

कार्यक्रमाला जपानी भाषेच्या शिक्षिका अंजनी पंचभाई, जपानी भाषा तज्ज्ञ विद्या आढाव आणि रूपाली काळे, तसेच अनेक वर्षांपासून जपानबरोबर काम करणारे वरिष्ठ व्यावसायिक रवी रासाळ आणि सैजश अशोकन यांची उपस्थिती लाभली.

बोनोबोनो हे जपानी मांगा आणि अॅनिमेशनमधील लोकप्रिय समुद्री ऊद पात्र असून, त्याचा निरागसपणा, कुतूहल, मैत्री आणि संवेदनशीलता मुलांना सहज आपलासा वाटतो. जपानमध्ये मुलांसाठी अनेक दर्जेदार अॅनिमे, कथा आणि अर्थपूर्ण पात्रांची समृद्ध परंपरा आहे. मात्र, त्यातील मोजकीच पात्रे आजवर भारतीय मुलांपर्यंत पोहोचली आहेत.

हीच दरी भरून काढण्याच्या उद्देशाने जपानमधील दर्जेदार अॅनिमे, दूरचित्रवाणी कार्यक्रम आणि दृक्-श्राव्य सामग्री भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. रिआन व्यासपीठ वेगवेगळ्या भाषेतील कथा भारतीय भाषांमध्ये उच्च दर्जाच्या आवाज रूपांतर आणि स्थानिकीकरणाच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत आहे. त्यामुळे मनोरंजनासोबत त्या कथांमधील सकारात्मक मूल्येही मुलांच्या परिचित भाषेत पोहोचू शकतील.

केवळ भाषांतर न करता मूळ पात्रांचा स्वभाव, भावना, विनोद आणि सांस्कृतिक संदर्भ जपत भारतीय प्रेक्षकांसाठी नैसर्गिक अनुभव निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. बोनोबोनो हा या प्रवासाचा पहिला टप्पा असून, भविष्यात आणखी दर्जेदार जपानी पात्रे आणि कथा भारतीय भाषांमध्ये मुलांपर्यंत पोहोचवणे, कौटुंबिक कार्यक्रम आयोजित करणे आणि शाळांशी संवाद साधणे, अशी व्यापक संकल्पना आहे.

या उपक्रमामागील भूमिका शर्वरी शिराळकर यांनी स्पष्ट करताना सांगितले की, “मुलांना मूल्यांवर आणखी एक धडा देण्याची गरज नाही; अनेकदा त्यांना फक्त असे एक पात्र हवे असते, जे त्यांना आवडते आणि जे आपल्या वागण्यातून ती मूल्ये दाखवते.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading