Thursday, June 11, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

ग्रामीण भागात युरिया खताचा तुटवडा; तातडीने साठा उपलब्ध करण्याची कृषिमंत्र्यांकडे आमदारांची मागणी


मुंबई : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण भागात युरिया आणि अन्य रासायनिक खतांचा तुटवडा जाणवत असून, युरिया खताचा पुरेसा साठा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी विविध पक्षांच्या आमदारांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.
केंद्र आणि राज्य सरकारकडून गतवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात खते उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये विशेषतः मराठवाड्यात युरियाची तीव्र टंचाई निर्माण झाल्याचे लोकप्रतिनिधींनी कृषिमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
भाजपचे आमदार सुरेश धस, शिवसेनेचे आमदार कैलास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह अन्य काही आमदारांनी कृषिमंत्री भरणे यांची भेट घेत आपल्या मतदारसंघांमध्ये युरिया खताचा मोठा तुटवडा असल्याची माहिती दिली. मंजूर कोट्यानुसार युरिया खताचा पुरवठा तातडीने करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत केंद्र सरकारच्या ॲपद्वारे खत वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र दुर्गम आणि डोंगराळ भागांमध्ये मोबाईल नेटवर्कची समस्या, ऑनलाइन व्यवहारांतील अडचणी तसेच अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसल्याने खत वितरणात अडथळे निर्माण होत असल्याचे आमदारांनी सांगितले.
या समस्यांची दखल घेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित सचिवांना तातडीने बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ॲपमधील तांत्रिक त्रुटी दूर करून चालू खरीप हंगामात प्रभावीपणे खत वितरण करण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading