पुणे येथील टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्स लिमिटेडला युकेच्या संसदेत दोन बहुमानांनी गौरवले
पुणे : टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्स लिमिटेडने अभिमानास्पद कामगिरी बजावून जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. ‘ब्रँडस्टोरी’ ने आयोजित केलेल्या ‘ग्लोबल ब्रँड अँड लीडरशिप कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये दोन प्रतिष्ठित पुरस्कार — ‘ग्लोबल आयकॉनिक ब्रँड २०२६’ आणि ‘ग्लोबल सोशल इम्पॅक्ट ब्रँड अवॉर्ड २०२६’ टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्स लिमिटेडने पटकावले आहेत.
टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्स लिमिटेडने गतिशीलता क्षेत्रात आणलेले तंत्रज्ञान आणि नावीन्य, तसेच या क्षेत्राचे त्यांनी केलेले उत्कृष्ट नेतृत्व यांची दखल घेत कंपनीला ‘ग्लोबल आयकॉनिक ब्रँड २०२६’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबरीने कॉर्पोरेट सामाजिक दायित्व आणि समाज-केंद्रित उपक्रमांप्रती बांधिलकी सातत्याने जपल्याबद्दल टाटा ऑटोकॉम्पला ‘ग्लोबल सोशल इम्पॅक्ट ब्रँड अवॉर्ड २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार सोहळा लंडन येथील युके संसदेच्या ‘हाउस ऑफ लॉर्ड्स’ मध्ये पार पडला. युनायटेड किंगडमचे माजी संसद सदस्य पॉल स्कली यांच्या हस्ते, युके संसदेच्या ‘हाउस ऑफ लॉर्ड्स’चे सदस्य लॉर्ड रामी रेंजर तसेच जागतिक पातळीवरील दिग्गज व्यावसायिक आणि धोरणकर्त्यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
१९९५ मध्ये सुरु करण्यात आलेली टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्स लिमिटेड ही टाटा समूहातील एक सदस्य आहे. भारतामध्ये वाहनांच्या सुट्या भागांच्या निर्मिती उद्योगक्षेत्राला अधिक बळकट करण्यात या कंपनीने महत्त्वपूर्ण आणि परिवर्तनात्मक भूमिका बजावली आहे. भविष्यातील मोठी उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यांसोबत हातमिळवणी करत, टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्स लिमिटेडने प्रगत तंत्रज्ञान आपल्याच देशात निर्माण केल्यामुळे आयातीवर अवलंबून राहावे लागण्याचे प्रमाण कमी झाले आहे, त्यासोबतच उत्पादनाचा दर्जा देखील उंचावला आहे. अतिशय उत्तम दर्जाच्या आणि कमी खर्चात गाड्या आणि त्यांचे सुटे भाग जिथे तयार होतात असे जागतिक पातळीवरील प्रमुख केंद्र म्हणून भारताला नावारूपास आणण्यात आणि शाश्वत तसेच इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्सचा एक भक्कम आधारस्तंभ बनण्यात कंपनीचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.
