Tuesday, June 2, 2026
ENTERTAINMENTLatest News

शर्वरी आणि वेदांगच्या ‘मस्कारा’ने इंटरनेटवर घडवला व्हायरल जलवा

 

इम्तियाज अली दिग्दर्शित मैं वापस आऊंगा या चित्रपटातील प्रेमगीत मस्कारा ने प्रेक्षकांच्या मनावर जबरदस्त छाप पाडली असून हे गाणं यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या गाण्यांपैकी एक ठरत आहे. १ कोटींहून अधिक व्ह्यूज आणि सोशल मीडियावर १ लाखांपेक्षा जास्त रिल्ससह मस्कारा हे वर्षातील सर्वात मोठ्या व्हायरल म्युझिक मोमेंट्सपैकी एक बनलं आहे. चित्रपटातील गाण्यापासून ते डिजिटल फिनॉमेननपर्यंतचा त्याचा प्रवास उल्लेखनीय ठरला आहे.

शर्वरी आणि वेदांग रैना यांच्या आकर्षक केमिस्ट्रीने सजलेलं मस्कारा हे गाणं दिग्गज संगीतकार ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलं असून इर्शाद कामिल यांनी त्याचे बोल लिहिले आहेत. खेळकर प्रेमभावना, आकर्षक दृश्यरचना आणि लगेच लक्षात राहणारा हुक यामुळे हे गाणं विविध प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या गाण्यावर चाहत्यांनी तयार केलेले व्हिडीओ, डान्स ट्रेंड्स आणि कंटेंट क्रिएटर्सनी बनवलेले विविध व्हर्जन्स यामुळे मस्कारा एक सांस्कृतिक ट्रेंड बनलं आहे.

या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना शर्वरी म्हणाली,“मी नेहमीच बॉलिवूड संगीताची मोठी चाहती राहिले आहे कारण गाणी लोकांच्या आठवणींचा आणि आयुष्यातील खास क्षणांचा भाग बनतात. त्यामुळे मी ज्या गाण्यांशी जोडली जाते, त्यांना प्रेक्षकांकडून इतकं प्रेम मिळताना पाहणं माझ्यासाठी खूप खास आहे. तरस, हाँ के हाँ आणि आता मस्कारा — ही गाणी स्वभावाने आणि मूडने पूर्णपणे वेगळी असली तरी त्यांना मिळालेलं प्रेम तितकंच विशेष आहे.

मस्काराबाबत मला सर्वात जास्त आनंद देणारी गोष्ट म्हणजे लोकांनी दाखवलेली सर्जनशीलता. दररोज मला या गाण्याच्या नव्या आणि वेगळ्या आवृत्त्या पाहायला मिळतात आणि विविध प्रकारे हे गाणं लोकांपर्यंत पोहोचताना पाहणं खूप आनंददायी आहे. कलाकार म्हणून प्रेक्षकांनी तुमच्या कामाशी नातं जोडणं आणि ते त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचा भाग बनवणं यापेक्षा मोठं समाधान दुसरं काही नाही. लोकांनी तयार केलेल्या सर्व आवृत्त्या मला मनापासून आवडत आहेत आणि त्यांनी या गाण्याचा आनंद असाच घेत राहावा, अशी माझी इच्छा आहे.”

या व्हायरल यशामागे शरवरीची विशेष चर्चा होत आहे. गाण्यातील तिचा पगडीधारी लूक आणि सहजसुंदर व्यक्तिमत्त्व हे प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनले आहे. फॅन एडिट्सपासून रिल्सपर्यंत सर्वत्र शर्वरीचा मस्कारा अवतार लोकप्रिय ठरत असून प्रेक्षकांमधील तिची वाढती लोकप्रियता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

गाण्याच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे मैं वापस आऊंगा या चित्रपटाबाबतची उत्सुकता देखील वाढली आहे. इम्तियाज अली यांच्या या बहुप्रतिक्षित चित्रपटात दिलजीत दोसांझ, नसीरुद्दीन शाह, वेदांग रैना आणि शर्वरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. फाळणीच्या भावनिक पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटाने घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.

१२ जून रोजी प्रदर्शित होणारा मैं वापस आऊंगा हा चित्रपट आता २०२६ मधील IMDb मोस्ट एंटिसिपेटेड इंडियन फिल्म्स यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. यावरून या चित्रपटाबद्दल देशभरातील प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता आणि वाढता प्रतिसाद स्पष्ट दिसून येतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading