‘अग्न्यास्त्र एनर्जेटिक्स’तर्फे आंध्र प्रदेशातील श्री सत्यसाई जिल्ह्यातधोरणात्मक संरक्षण प्रकल्पाची पायाभरणी
पुणे : ‘भारत फोर्ज लिमिटेड’च्या संरक्षण क्षेत्रातील व्यवसायाशी संबंधित ‘कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड’ची (केएसएसएल) पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या ‘अग्न्यास्त्र एनर्जेटिक्स लिमिटेड’ने आंध्र प्रदेशात नवा संरक्षण उत्पादन प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. या राज्यातील श्री सत्यसाई जिल्ह्यात मदकसिराजवळ या धोरणात्मक प्रकल्पाची पायाभरणी नुकतीच करण्यात आली.
१,००० एकरांहून अधिक क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या एकात्मिक प्रकल्पासाठी पुढील २ ते ४ वर्षांत सुमारे १,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, उच्च-सुरक्षा चाचणीच्या पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्सच्या विशेष क्षमता लक्षात घेऊन हा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे आधुनिक संरक्षण आणि एअरोस्पेस क्षेत्रासाठी महत्त्वाच्या प्रगत एनर्जेटिक्स आणि दारुगोळा प्रणालींमध्ये भारताच्या स्वदेशी क्षमतांना मोठी चालना मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे सुमारे ८०० जणांना थेट रोजगार मिळण्याची, तर अंदाजे २,५०० अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना मिळण्यासोबतच एअरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी आंध्र प्रदेश एक महत्त्वाचे केंद्र म्हणून अधिक बळकट होणार आहे.
संरक्षण क्षेत्रासाठी दारुगोळा आणि क्षेपणास्त्रांसाठी लागणाऱ्या विशेष साहित्याच्या (एनर्जेटिक्स) आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ‘अग्न्यास्त्र एनर्जेटिक्स’ची स्थापना करण्यात आली आहे. स्वदेशी पातळीवर डिझाइन केलेली, विकसित केलेली आणि जागतिक मानकांनुसार तयार केलेली उत्पादने उपलब्ध करून देणे हा या कंपनीचा उद्देश आहे. हा उपक्रम भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेशी सुसंगत असून, आयातीसाठी पर्याय निर्माण करणे, स्थानिक मूल्यनिर्मिती वाढवणे आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या साहित्यांमध्ये तांत्रिक स्वावलंबन साध्य करणे यावर त्याचा भर आहे.
‘भारत फोर्ज लिमिटेड’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी म्हणाले, “प्रगत संरक्षण प्रणाली आणि महत्त्वाच्या साहित्यासाठी जागतिक स्तरावर विश्वासार्ह पुरवठादार म्हणून उदयास येण्याची मोठी संधी भारतासमोर आहे. अग्न्यास्त्र एनर्जेटिक्स हा स्वदेशी संरक्षण साहित्य क्षेत्राला बळकटी देण्याच्या दिशेने उचललेला महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रकल्पामुळे भारताची जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक क्षमता वाढण्यास मदत होईल. तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी अत्याधुनिक संरक्षण साहित्य विकसित करण्यालाही चालना मिळेल.”
संरक्षण उत्पादन, धातुकर्म आणि सिस्टिम्स इंटिग्रेशन क्षेत्रातील कल्याणी समूहाच्या सहा दशकांच्या अनुभवाच्या बळावर अग्न्यास्त्र एनर्जेटिक्स सुरुवातीपासूनच सर्वोत्तम सुरक्षा मानके, अभियांत्रिकी शिस्त आणि औद्योगिक प्रशासन पद्धती अंगीकारणार आहे. भारताच्या संरक्षण उद्योग परिसंस्थेला अधिक बळकटी देणे, राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे आणि विकसित भारत २०४७ या दीर्घकालीन उद्दिष्टात योगदान देणे, यामध्ये कंपनी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
