‘एअर इंडिया एक्सप्रेस’ला ‘स्कायट्रॅक्स’च्या पहिल्या ऑडिटमध्ये जागतिक विमान कंपनीचे ‘फोर-स्टार रेटिंग’
पुणे : ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ला स्कायट्रॅक्स या संस्थेने जागतिक विमानसेवेतील चार तारांकित मानांकन दिले आहे. कंपनीच्या पहिल्या संपूर्ण तपासणीनंतर तिला हे मानांकन मिळाले आहे. ग्राहकांना चांगला अनुभव यावा, यासाठी कंपनीने केलेल्या प्रयत्नांचा हा महत्त्वाचा परिणाम आहे.
‘स्कायट्रॅक्स’चे ‘वर्ल्ड एअरलाईन स्टार रेटिंग’ हे विमान वाहतूक क्षेत्रातील गुणवत्ता मोजण्याचे जगातील सर्वात जुने आणि प्रतिष्ठित मानांकन आहे. हे मानांकन एखाद्या विमान कंपनीच्या विमानातील सेवा आणि विमानतळावरील सुविधांची सखोल आणि स्वतंत्र तपासणी करून दिले जाते. यासाठी जगभर एकसारखी आणि निश्चित मूल्यांकन पद्धत वापरली जाते. फोर-स्टार रेटिंग हे कमी किमतीत सेवा देणाऱ्या विमान कंपन्यांसाठी मिळू शकणारे सर्वोच्च मानांकन मानले जाते. भारत आणि पश्चिम आशियातील ज्या काही मोजक्या विमान कंपन्यांना आतापर्यंत हा सन्मान मिळाला आहे, त्यांच्या गटात एअर इंडिया एक्सप्रेस आता हे मानांकन मिळाल्यामुळे सामील झाली आहे. तसेच, आता ही कंपनी स्कायट्रॅक्सच्या जागतिक दर्जाच्या सर्वोच्च फाइव्ह-स्टार विमान कंपन्यांच्या यादीपासून फक्त एक पायरी दूर आहे.
या सन्मानाबद्दल बोलताना ‘एअर इंडिया एक्सप्रेस’चे अध्यक्ष निपुण आगरवाल म्हणाले, “पहिल्याच ऑडिटमध्ये ‘स्कायट्रॅक्स’कडून फोर-स्टार जागतिक विमान कंपनीचे मानांकन मिळणे म्हणजे आमच्या प्रवाशांच्या अनुभवात झालेल्या मोठ्या बदलाची आणि आमच्या टीमने केलेल्या उत्कृष्ट कामाची महत्त्वपूर्ण दखल आहे. आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने कमी कालावधीत विस्तार केला, आमचा विमानांचा ताफा आधुनिक केला, सेवा अधिक उत्कृष्ट केली आणि ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ला वेगळ्या दर्जाची मूल्याधारित विमान कंपनी म्हणून उभे केले. प्रवाशांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद, एनपीएस (नेट प्रमोटर स्कोर) आणि सोशल मीडियावरील चांगल्या प्रतिक्रिया यांमुळे आमच्या सुधारित सेवांना आणि सुविधांना नव्या भारतातील ग्राहकांची पसंती मिळत असल्याचे स्पष्ट दिसते. आजचा ग्राहक अधिक पर्याय, आराम आणि विश्वासार्हता यांना महत्त्व देतो. आम्हाला मिळालेला हा सन्मान प्रेरणादायी असला तरी फोर-स्टार रेटिंग हे आमचे अंतिम ध्येय नाही, तर पुढे आणखी उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी आणि उद्योगातील मानके अधिक उंचावण्यासाठीचा हा मजबूत पाया आहे.”
ज्या विमान कंपन्या एकूण सेवेमध्ये उच्च दर्जाची गुणवत्ता राखतात, अशांना फोर-स्टार रेटिंग दिले जाते., असे ‘स्कायट्रॅक्स’च्या वेबसाइटवर नमूद आहे. उत्तम सुविधा, चांगल्या दर्जाच्या, मानकांच्या सेवा आणि कर्मचाऱ्यांची सेवा देण्याची पद्धत यांचा यांमध्ये विचार होतो. ‘एअर इंडिया एक्सप्रेस’बाबत ‘स्कायट्रॅक्स’ने नमूद केले आहे की, या कंपनीच्या विमानातील सुविधा आणि सेवा प्रवाशांच्या अपेक्षांशी चांगल्या प्रकारे जुळतात. तसेच, सातत्यपूर्ण कार्यपद्धती, विमानतळावरील चांगल्या सेवा आणि व्यावसायिक, कार्यक्षम व सुयोग्य पद्धतीने दिली जाणारी केबिन सेवा ही या कंपनीची खास वैशिष्ट्ये आहेत.
‘एअर इंडिया एक्सप्रेस’च्या मोठ्या परिवर्तनामागील एक महत्त्वाचा भाग म्हणजे आधुनिक आणि इंधन बचत करणाऱ्या विमानांचा वाढता वापर. यामुळे ही कंपनी छोट्या प्रमाणावर काम करणाऱ्या विमान सेवेतून भारतातील देशांतर्गत आणि अल्प पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये मार्ग आणि स्थानकांच्या संख्येनुसार दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी बनली आहे. आज ‘एअर इंडिया एक्सप्रेस’कडे १००हून अधिक विमानांचा ताफा आहे. त्यातील जवळपास दोन-तृतीयांश विमाने नवीन आहेत. यासोबतच, प्रवाशांसाठी अधिक आरामदायी आसने, गरम जेवणासाठी ओव्हन आणि काळजीपूर्वक निवडलेल्या विमानातील सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सेवा प्रशिक्षण आणि सेवा देण्याच्या पद्धतीतही नियोजनबद्ध सुधारणा करण्यात आल्या आहेत. हे सर्व बदल कंपनीच्या अतिशय वेगाने झालेल्या विस्तारासोबत करण्यात आले आहेत. सध्या एअर इंडिया एक्सप्रेस दररोज ५००हून अधिक उड्डाणे चालवते आणि ४२ देशांतर्गत शहरांना तसेच दक्षिण, आग्नेय व पश्चिम आशियातील १७ आंतरराष्ट्रीय ठिकाणांना जोडते.
‘एअर इंडिया एक्सप्रेस’ने प्रवाशांच्या अनुभवात आणि सकारात्मक प्रतिसादात केलेल्या बदलांचे परिणाम दाखवले आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी, कंपनीचा नेट प्रमोटर स्कोअर (एनपीएस) तीनपट वाढून सर्वाधिक पातळीवर पोहोचला आहे. एनपीएस ही ग्राहकांची निष्ठा मोजण्याची जागतिक मानक पद्धत आहे. प्रवासी त्यांच्या एकूण अनुभवावरून एखाद्या ब्रँडची शिफारस किती करतील हे ती दर्शविते.
