Wednesday, May 6, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

प्राचीन ज्ञानपरंपरा वर्तमानातील युवा पिढीमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न आवश्यक – प्रदीप रावत

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर व सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

पुणे :  भारतीय ज्ञानपरंपरा समृद्ध होती आणि आहे, मात्र ही ज्ञानपरंपरा उज्ज्वल भूतकाळापुरती न राहता, वर्तमानात आणि युवा पिढीच्या मनात कशी रुजवता येईल, याचा विचार आणि कृती आवश्यक आहे. भांद्दरकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर या संस्थेच्या भारतविद्या डिजिटल व्यासपीठाचे माध्यम तरुण पिढीला आणि आधुनिक काळाला, या वारशाशी जोडण्यास साह्यभूत ठरेल, असा विश्वास भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत यांनी व्यक्त केला. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर व सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला यानिमित्ताने भांडारकर संस्थेच्या फिरोदिया सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सदर सामंजस्य करारासाठी परिमल अँड प्रमोद चौधरी फाऊंडेशनचे विशेष सहकार्य लाभले आहे.

यावेळी याप्रसंगी ज्येष्ठ मूर्तिशास्त्रतज्ज्ञ गो. बं. देगलूरकर, परिमल अँड प्रमोद चौधरी फाऊंडेशनच्या संस्थापिका परिमल चौधरी, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड, सीओईपीचे सहायक अधिष्ठाता डॉ. प्रशांत बारटक्के, अप्लाइड सायन्स विभागाचे प्रमुख डॉ. महेश शिंदीकर, एनइपी व आयकेएसच्या समन्वयक डॉ. प्रीतम सेलमोकर, भांडारकर संस्थेचे विश्वस्त भरत फाटक, अॅकेडेमिक कौन्सिलचे प्रमुख डॉ. प्रदीप आपटे, भारतविद्या डिजिटल प्लॅटफॉर्म प्रकल्पाच्या प्रमुख व महाभारत कल्चरल इंडेक्सच्या कार्यकारी संपादक डॉ. गौरी मोघे व इंडी हेरीटेजचे संस्थापक तुषार जोशी उपस्थित होते.

नव्या शैक्षणिक धोरणानुसार पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान प्रणाली अर्थात आयकेएसचा २ क्रेडीटचा कोर्स आवश्यक केला आहे. सदर कोर्स भांडारकर संस्थेतर्फे विकसित करण्यात आला आहे व संस्थेच्या भारतविद्या या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विविध विद्यापीठांना व महाविद्यालयांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. वर नमूद सामंजस्य करारांतर्गत सदर ऑनलाईन कोर्स हा सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या १६०० हून अधिक विद्यार्थ्यांना देण्यात येईल. यातील १ वर्ष सर्व विद्यार्थ्यांची फी परिमल अँड प्रमोद चौधरी फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणार आहे. तसेच नजीकच्या भविष्यात भांडारकर संस्था व सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ एकत्र येवून आणखी काय करु शकतील याविषयी दोन्ही संस्थांमधील तज्ञ विचारमंथन करणार आहेत, असे देखील यावेळी सांगण्यात आले.

रावत पुढे म्हणाले, वर्तमानाचे भान सोडून भूतकाळात रमण्यापेक्षा समृद्ध गतकाळाचा धागा वर्तमानाशी नेमका कशा प्रकारे जोडता येईल, यादृष्टीने नव्या शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आले आहेत आणि त्यासाठी श्रेयांकही देण्यात आले आहेत. त्यातून आपल्या समृद्ध वारशाशी आपली युवा पिढी परिचित होईल आणि वर्तमानाच्या आरशात आपल्याला समृद्ध भूतकाळाचे यथायोग्य प्रतिबिंब पाहता येईल.

डॉ. गौरी मोघे म्हणाल्या की, भारतविद्या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी कंटेंट तयार करत असताना या विषयाबद्दल जागरूक असण्याऱ्या संस्था व व्यक्तींकडून अर्थसहाय्य मिळते. परंतु, संधोधनाचा भक्कम पायावर भांडारकर संस्थेने विकसित केलेल्या आयकेएसच्या २ क्रेडिटच्या या ऑनलाईन कोर्सचा फायदा थेट विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी प्रथमच परिमल अँड प्रमोद चौधरी फाऊंडेशने निधी उपलब्ध करून दिला. हे एक पथदर्शी व स्वागतार्ह पाउल आहे. यातून प्रेरणा घेवून इतर संस्था देखील पुढे येवून हा कोर्स वेगवेगळ्या महाविद्यालयातील किंवा विद्यापीठातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी मदत करतील, अशी आम्हाला आशा आहे.

परिमल चौधरी म्हणाल्या, हजारो वर्षांचा ज्ञानवारसा भांडारकर, डेक्कन कॉलेजसारख्या संस्थांनी जपला आहे. सीओईपीसारखी प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था गुणवत्तापूर्ण वर्तमानकालीन तंत्रस्नेही अभ्यासक्रमाच्या माध्यमातून युवा पिढी घडवण्याचे कार्य करत आहे. युवा पिढीसाठी वारसा जतन व संशोधन करणारी संस्था आणि तंत्रस्नेही शैक्षणिक विद्यापीठ एकत्र आले, तर आपल्या ज्ञानपरंपरा, संस्कृतीकडे पाश्चात्त्य नजरेने न पाहता, भारतीय दृष्टीने पाहण्यास विद्यार्थ्यांना साह्य होईल, यासाठी फाऊंडेशनने सहकार्य केले आहे.

डॉ. प्रशांत बारटक्के यांनी संशोधन, ज्ञान, तंज्ञकुशल मानवी प्रयत्नांचा हा सुंदर प्रयोग ठरेल, अशा शब्दांत या उपक्रमाचे कौतुक केले. डॉ. महेश शिंदीकर यांनी भारतीय ज्ञान परंपरेची ओळख युवा पिढीला करून देण्यासाठी भांडारकरच्या माध्यमातून आश्वासक पर्याय मिळाल्याचा उल्लेख केला. भरत फाटक यांनी संशोधनाला आधुनिक तंत्रकुशलतेची जोड आवश्यक असून, ऑनलाईन अभ्यासक्रमांच्या रूपाने ती उपलब्ध झाल्याचा आनंद व्यक्त केला.

यानिमित्त डॉ. देगलूरकर यांचे ‘ भारतीय ज्ञान परंपरा – मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्र ‘ या विषयावर बीजभाषण झाले. “भारतीय स्थपती आणि शिल्पींनी पाषाणांतून अमूर्तता साकार केली आणि मूर्तीशास्त्र व स्थापत्याचा सर्वोच्च आविष्कार घडवून, पुन्हा साकारतेला तत्त्वज्ञानाकडे नेणारी दिशा दिली. जगाच्या ज्ञात इतिहासात ही किमया फक्त भारतातच घडली आणि तेच भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण ठरले आहे. लौकिकातून पारलौलिकाकडे नेणारे तत्त्वज्ञान कथन करणारे मूर्तिवैभव हा  आपल्या प्राचीन ज्ञानपरंपरेचा वारसा आहे आणि त्याचे जतन करण्याची आवश्यकता आहे,” असे ते म्हणाले.

डॉ. प्रदीप आपटे यांनी आभार मानले. अदिती हर्षे यांनी सूत्रसंचालन केले. या सामंजस्य करारासाठी सीओइपीचे डीन इंजिनीरिंग डॉ पराग सदगीर, कुलसचिव डॉ. डी. एन. सोनवणे, सहयोगी अधिष्ठाता डॉ संदीप मेश्राम यांची भूमिका महत्वाची ठरली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading