आरती अंकलीकर यांच्या सुरांनी रंगली संगीतमय मैफल
पुणे : श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने ‘सद्गुरु श्री जंगली महाराज १३६ वा पुण्यतिथी उत्सव’ भक्तिभावात साजरा करण्यात येत असून, या निमित्ताने ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर यांच्या सुरेल गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाची सुरुवात राग केदारमधील ‘राम नाम जपत’ या रचनेने झाली. त्यानंतर संत रामदास यांचे “तानें स्वर रंगवावा.. मग तो रघुनाथ ध्यावा..” हे पद सादर करून भक्तिरसाची उधळण करण्यात आली. पुढे संत मीराबाई यांचे ‘म्हारे घर आओ जी’ हे भजन सादर करत श्रोत्यांना निस्सिम भक्तीच्या भावविश्वात नेले.
यासोबतच ‘अवघा रंग एक झाला’ या अभंगाच्या सुरेल सादरीकरणाने श्रोते शास्त्रीय संगीताच्या दुनियेत रममाण केले.
दरम्यान, गुरुवार दि. २ एप्रिल रोजी दुपारी १ नंतर मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, या उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
