२८ वा कलाश्री पुरस्कार गायिका आरती अंकलीकर- टिकेकर यांना जाहीर
युवा तबला वादक सोहम गोराणे याचा कलाश्री युवा पुरस्काराने होणार सन्मान
पुणे : गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा कलाश्री पुरस्कार यावर्षी ख्यातनाम गायिका आरती अंकलीकर- टिकेकर यांना तर कलाश्री युवा पुरस्कार पं योगेश समसी यांचे शिष्य, युवा तबला वादक सोहम गोराणे यांना जाहीर झाला असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. सुधाकर चव्हाण यांनी कळविली आहे.
कलाश्री पुरस्काराचे हे २८ वे वर्ष असून पुढील महिन्यात संपन्न होणाऱ्या कलाश्री संगीत महोत्सवात माजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ कलाश्री पुरस्कार तर शकुंतला ढोरे यांच्या स्मरणार्थ कलाश्री युवा पुरस्कार अनुक्रमे आरती अंकलीकर टिकेकर व सोहम गोराणे यांना प्रदान करण्यात येईल.
रोख रु. १ लाख ५१ हजार १०१, मानचिन्ह आणि मानपत्र असे कलाश्री पुरस्काराचे तर रोख रु. ११ हजार मानचिन्ह व मानपत्र असे कलाश्री युवा पुरस्काराचे स्वरूप आहे. आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते कलाश्री पुरस्कार तर पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते युवा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहितीही पं. सुधाकर चव्हाण यांनी कळविली आहे.
या आधी उस्ताद सईदउद्दीन डागर, पं. फिरोज दस्तूर, पं. भवानी शंकर, उस्ताद उस्मान खान, पं. सुरेश तळवलकर, माऊली टाकळकर, श्रीनिवास जोशी, पं. आप्पासाहेब जळगावकर, पं. नाथ नेरळकर, जयमला शिलेदार आदी संगीत क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या कलाकारांना कलाश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून युवा पुरस्काराचे हे विसावे वर्ष असल्याची माहिती पं. सुधाकर चव्हाण यांनी दिली.
