Wednesday, April 8, 2026
Latest NewsSports

लायन शंतनु सिद्धा स्मृतीप्रित्यर्थ चौथ्या ‌‘लायन्स्‌‍ प्रौढ करंडक‌’ टी-२० क्रिकेट २०२६ स्पर्धेचे १ मार्चपासून आयोजन !!

पुणे :  स्पोर्ट्‌‍सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे लायन शंतनु सिद्धा स्मृतीप्रित्यर्थ चौथ्या ‌‘लायन्स्‌‍ प्रौढ करंडक‌’ (४० वर्षावरील) टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १ मार्च ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स स्पोर्ट्‌‍स ॲकॅडमी मैदानावर होणार आहे.

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पोर्ट्‌‍सफिल्ड मॅनेजमेंटचे सनी मारवाडी यांनी सांगितले की, साखळी आणि बाद फेरीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत एकूण ११ निमंत्रित संघ सहभागी होणार आहेत. ४० वर्षावरील खेळाडू या स्पर्धेत भाग घेणार आहेत. ही स्पर्धा लायन शंतनु सिद्धा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे सलग चौथे वर्ष असून साखळी आणि बाद फेरी मिळून एकूण २५ सामने स्पर्धेत होणार आहेत. स्पर्धेचे सामने हे आठवड्याच्या शनिवार आणि रविवार या दिवशी खेळवण्यात येणार आहेत.

गार्गी एज्युकॉन, एलिट क्रिकेट क्लब, भाऊ कोकणे क्लब, अनिलदादा फ्रेन्ड्स क्रिकेट क्लब, लायन्स्‌‍ क्लब ऑफ पुणे रहाटणी, रिस्क्राईब, सीए वॉरीयर्स, नायर नाईट रायडर्स, ब्रेव्हहार्ट व्हेटरन्स्‌‍, पासलकर रॉयल्स्‌‍ आणि स्कॉर्ग या संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी, १ मार्च रोजी लायन्स्‌‍ डिस्ट्रीक्ट ३२३४ डी२ चे वाईस डिस्ट्रीक्ट गव्हर्नर ला. श्रेयसजी दिक्षीत, लायन्स्‌‍ क्लब डिस्ट्रीक्ट ३२३४डी२ स्पोर्ट्‌‍स चेअरपर्सन ला. श्रीनाथ खैरे यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनाचा सामना नायर नाईट रायडर्स आणि रिस्क्राईब या दोन संघांमध्ये रंगणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना आणि स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, १८ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे.

विजेत्या संघाला करंडक तर, उपविजेत्या संघाला करंडक मिळणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक तसेच उदयोन्मुख खेळाडू याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर आणि फायटर ऑफ मॅच अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गतवर्षी (२०२५) रिस्क्राईब संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading