Pune : महापौरपदी मंजुषा नागपुरे, उपमहापौरपदी परशुराम वाडेकर
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात सोमवारी महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी तर परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.
महापौर पदासाठी एकूण तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. भाजपकडून मंजुषा नागपुरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शीतल अजय सावंत तर काँग्रेसकडून अश्विनी लांडगे यांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. मात्र माघारीच्या १५ मिनिटांच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल सावंत आणि काँग्रेसच्या अश्विनी लांडगे यांनी आपले अर्ज मागे घेतले. भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्यांशी चर्चा करून निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शिष्टाई केली आणि ती यशस्वी ठरली. त्यामुळे मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सभागृहातील सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
उपमहापौर पदासाठी तीन उमेदवारांनी एकूण सहा अर्ज दाखल केले होते. काँग्रेसकडून साहिल केदारी यांनी दोन, भाजपकडून परशुराम वाडेकर यांनी तीन, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्ता बहिरट यांनी एक अर्ज दाखल केला होता. अर्ज माघारीसाठी दिलेल्या वेळेत पुन्हा एकदा भाजप गटनेते गणेश बिडकर यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर साहिल केदारी आणि दत्ता बहिरट यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.
निवडीनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते मंजुषा नागपुरे व परशुराम वाडेकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
