Wednesday, April 8, 2026
Latest NewsPUNE

मनोविकारग्रस्तांसाठी अचूक व एकत्रित उपचारपद्धती गरजेची

 

एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ आणि प्राज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संवादात्मक चर्चेत ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञांचे प्रतिपादन

पुणे  : मनोविकारग्रस्त रुग्णांसाठी नेमके निदान, प्रभावी औषधोपचार, समुपदेशन, स्वमदत आधार गट, कुटुंबीयांचा पाठिंबा आणि अचूक, पूरक उपचारपद्धती गरजेची असल्याचे मत ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञांनी व्यक्त केले. सध्याच्या विभक्त कुटुंबपद्धतीमुळे रुग्णांसाठी कुटुंबीयांचा आधार ढासळत चालल्याचे वास्तवही तज्ज्ञांनी पुढे आणले. एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ आणि प्राज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फिनिक्स उपक्रमांतर्गत पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित चर्चात्मक संवादात अनेक तज्ज्ञांचा सहभाग होता.

फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील विद्यार्थी सहाय्यक समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘आत्मभान जागताना’ (मानसिक आजारातून सुधारणेच्या स्वानुभव कथा) या मराठी तसेच ‘केऑस टू काल्म’ (Chaos To calm) या इंग्रजीतील याच पुस्तकाच्या अनुवादाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानिमित्त हा चर्चात्मक संवाद आयोजिण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे, प्राज फाउंडेशनचे विश्वस्त अनंत बवरे, ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके, डॉ. विद्याधर वाटवे, डॉ. वासुदेव परळीकर, ‘सा’ संस्थेचे माजी अध्यक्ष अमृत कुमार बक्षी, एकलव्य फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल वर्तक आदी उपस्थित होते. पुस्तकासाठी कथा देणाऱ्यांपैकी विजय नल्लावाला, अकिला माहेश्वरी व वीरेन राजपूत यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.

ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. विद्याधर वाटवे यांनी मनोरुग्णांसाठी शारीरिक पातळीवर प्रभावी औषधोपचारांचे महत्त्व सांगितले. मनोविकारग्रस्त रुग्णावरील उपचार एकच घटक करू शकत नाही. ते टीमवर्क असते. मनोविकारतज्ज्ञ, रुग्णाचे कुटुंबीय, समुपदेशक, समाजसेवक असे इतर घटकही महत्त्वाचे असतात. गेल्या ५० वर्षांत मनोविकारांवरील (सायकोफार्मोलाजी) अनेक औषधांचे संशोधन झाले असून, नवी औषधे विकसित झाली आहेत. मनोरुग्णांच्या भावना, आंदोलने स्थिर तसेच शांत ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो, असे ते म्हणाले.

डॉ. लुकतुके यांनी मनोरुग्णांवरील उपचारांमध्ये स्वमदत गटांचे साह्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. स्वतः स्वतःला मदत करायला शिकणे आणि त्यातून आत्मभान जागवणे, यासाठी रुग्णाला अनेक घटकांची एकत्रित मदत लागते. रुग्ण गोंधळलेला असतो. अशावेळी स्वमदत गट साह्यकारी ठरतात, असे ते म्हणाले.

डॉ. मोहन आगाशे म्हणाले, “सध्या आपण बुद्धी, भावना, संवेदना यांनाच मन समजतो की काय, अशी शंका वाटण्यासारखे वातावरण आहे. एकत्र कुटुंबात रुग्णासाठी घरातच पाठिंबा, मदत करणारे, समजून घेणारे हात होते. आता न्यूक्लिअर फॅमिलीमुळे कुटुंब ही संकल्पनाच बदलली आहे. अशा वेळी या पुस्तकाच्या रूपाने मन आणि बुद्धीचा समसमा संयोग पुढे आला आहे. बदलत्या काळात शरीराचे मनाशी नाते कशा प्रकारचे आहे, हे सांगणारे अनुभव लिहिणारी पुस्तकातील मंडळी देखील थेरपीस्ट म्हणावी लागतील. मनोरुग्णावरील उपचार हा एकट्याने करायचा नसून, एकत्रितपणे करण्याचा प्रवास आहे.”

डॉ. वासुदेव परळीकर यांनी अध्यक्षीय समारोप करताना या क्षेत्रात निदानाची आवश्यकता आणि निदानाच्या मर्यादा, यांचे भान जागे ठेवण्याची गरज अधोरेखित केली. रुग्णांच्या संदर्भात तज्ज्ञांच्या भूमिकाही बदलत राहतात, त्या अपेक्षांना तज्ज्ञ न्याय देतात का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

अनिल वर्तक म्हणाले, बर्‍या झालेल्या मनोरुग्णांचे अनुभव पुस्तकरूपाने यावेत, त्यांचा बरे होण्याचा प्रवास, त्यासाठीचा संघर्ष पुढे यावा आणि त्यांच्या अनुभवांतून इतरांना काही प्रेरणा मिळावी, अशा समाजाभिमुख हेतूने या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.

अमृत कुमार बक्षी यांनी एकलव्य फाउंडेशनसारख्या संस्था या रुग्ण आणि वैद्यकीय तज्ज्ञ यांच्यामधील सेतूप्रमाणे असतात. कुटुंबीयांचा आधार, पाठिंबा असेल तर रुग्ण अधिक गतीने बरा होण्याची शक्यता असते. कुटुंबीयांप्रमाणे काळजी, आस्था इतरत्र मिळणे कठीण असते, असे सांगितले.

प्राची बर्वे यांनी पुस्तकातील कथांचे संकलन व शब्दांकन करतानाचा प्रवास उलगडला. प्राज फाउंडेशनचे अनंत बवरे यांनी प्राज फाउंडेशनच्या कार्याची माहिती सांगितली. अनिल धनेश्वर यांनीही मनोगत मांडले. अनुवादक मृण्मयी कुलकर्णी यांचेही भाषण झाले. स्मिता गोडसे यांनी आभार मानले. मंजिरी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading