लिथियम बॅटरीला आता सोडियम आयन बॅटरीचा पर्याय विकसित करण्यात पुण्यातील शात्रज्ञ डॉ. विलास शेळके यांना यश
पुणे : इलेक्ट्रिक वाहने अचानकपणे पेटण्याच्या अनेक घटना घडल्याचे आपण ऐकतो मात्र आता, नजीकच्या भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी वाहनांमध्ये लिथियम बॅटरीचा वापर करण्याऐवजी त्याला पर्याय म्हणून सोडियम आयन बॅटरीचा वापर करता येणे शक्य होणार आहे.
भारतात अशा प्रकारची बॅटरी पहिल्यांदाच तयार करण्यात आली असून त्याला केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करत असलेल्या व देशातील वाहनउद्योगाची प्रमाणन, संशोधन व विकास संस्था असलेल्या ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एआरएआयने मान्यता दिली आहे. सदर बॅटरी एआरएआयच्या वतीने मोशी येथील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (पीआयईसीसी) येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सिम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली आहे.
आगामी आठ ते नऊ महिन्यात ही बॅटरी भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती बॅटरी विकसित करणाऱ्या रिचार्जीयन एनर्जी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास शेळके यांनी दिली. सदर कंपनी पाषाण येथील एनसीएल इनोव्हेशन पार्क येथे कार्यरत आहे.
एआरएआयच्या ‘टेक्नोव्हस’ या खास वाहन उद्योगातील स्टार्टअप साठी असलेल्या व्यासपीठाच्या माध्यमातून रिचार्जीऑन एनर्जी या कंपनीला लिथियम बॅटरीला पर्याय म्हणून सोडियम आयन बॅटरी तयार करण्यासाठी सुरुवातीला आवश्यक मदत व काही निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानंतर केंद्रीय अवजड उदयोग मंत्रालय, इंडो यूएस प्रोग्राम आणि युनायटेड नेशन यांच्याकडून ही बॅटरी विकसित करण्यासाठी सुमारे ४ कोटी रुपये इतका संशोधन व विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे डॉ. शेळके यांनी सांगितले.
लिथियम बॅटरी तयार करण्यासाठी लिथियम, कोबाल्ट, निकेल याची आवश्यकता असते. भारतामध्ये ते उपलब्ध नाही, त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात आयात करावे लागते. लिथियम बॅटरी वापरण्याचा कालावधी हा सहा ते सात वर्ष इतका असतो. आपल्या वाहनांच्या १५ ते २० वर्षांच्या कालावधीत आपल्याला लिथियमची बॅटरी दोन ते तीन वेळा बदलावी लागते. या खेरीज लिथियम बॅटरी चार्ज करण्यासाठी लागणारा वेळ देखील अधिक आहे. ही बॅटरी पेटण्याच्या घटना वारंवार घडत असतात.
इलेक्ट्रिक वाहनाच्या सुरक्षेचा विचार करून लिथियम बॅटरीला पर्याय म्हणून सोडियम आयन बॅटरी तयार करण्यात आली आहे असे सांगत शेळके म्हणाले, “ भारतामध्ये सोडियमचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. सोडियम हे समुद्राच्या पाण्यातून मिळते. ही बॅटरी तयार करण्यसाठी ऍग्री वेस्टचा वापर करण्यात येतो. लिथियम बॅटरी तयार करण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी विदेशातून मागवाव्या लागतात. मात्र, सोडियम आयन बॅटरीच्या बाबतीत तसे अजिबात नाही. या बॅटरीच्या निर्मितीची प्रक्रिया भारतामध्येच करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या बॅटरीला आग लागत नाही. याची चाचणी एआरएआयने १२० डिग्री तापमानावर केली आहे, त्यामध्ये ही बॅटरी यशस्वी झाली आहे.”
सोडियम आयन बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांसाठी वापरता येणे शक्य असून त्याच्या चार्जिंगसाठी ३० मिनिटांचा अवधी लागतो. एकदा बसवण्यात आलेल्या या बॅटरीचे लाइफ लिथियम बॅटरीच्या तीनपट म्हणजे २२ वर्षांपर्यंत असेल. मुख्य म्हणजे याची किंमत देखील सध्या वापरात असलेल्या लिथियम बॅटरीपेक्षा सुमारे २५ ते ३० टक्के कमी असेल.
पुढल्या आठ ते नऊ महिन्यामध्ये ही बॅटरी इलेक्ट्रिक गाड्यांसाठी बाजारात उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्यात दुचाकी वाहनासाठी, दुसऱ्या टप्यामध्ये तीनचाकी वाहनासाठी आणि तिसऱ्या टप्यामध्ये चारचाकी वाहनासाठी ही बॅटरी उपलब्ध करून देण्यात येईल. नजीकच्या भविष्यात त्याची निर्मिती करण्यासाठी पुण्यामध्ये कारखाना सुरु करण्याची योजना असून त्यासाठी सुमारे ५० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. आवश्यक गुंतवणूक उभी करण्यासाठी काही गुंतवणूकदारांची चर्चा सुरु असल्याचे डॉ. शेळके यांनी नमूद केले.
