Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने दीपस्तंभ पुरस्कारांचे वितरण

पुणे : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत समानता, सन्मान आणि संधी पोहोचवण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या दीपस्तंभ फाउंडेशन – मनोबलचा यावर्षीचा प्रजासत्ताक दिन सर्वार्थाने विशेष ठरला. दिव्यांग विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण आणि दीपस्तंभ पुरस्कारांचे वितरण या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत मान्यवरांच्या कार्याचा यथार्थ सन्मान दीपस्तंभ मनोबलच्या जळगाव प्रकल्पात एका हृद्य कार्यक्रमादरम्यान पार पडला.

या निमित्ताने कोल इंडिया लिमिटेडच्या मनुष्यविकास अधिकारी आणि मनोबलच्या माजी विद्यार्थिनी परिधी वर्मा (प्रज्ञाचक्षू) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच साहित्य, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रातील दीर्घकालीन योगदानाबद्दल सुप्रसिद्ध लेखक, वक्ते डॉ. अच्युत गोडबोले यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमास चंद्रशेखर शेठ, यतेंद्र शहा,  गोवा राज्य दिव्यांग आयुक्त कार्यालयातील ताहा सर तसेच  बजाज फिनसर्वच्या वरिष्ठ अधिकारी दिक्षिता चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

दिव्यांग व्यक्तींच्या हक्क आणि समावेशनासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल गोवा राज्य दिव्यांग आयुक्तालयाला विवेकानंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अजय मिनोचा (सोल्यूशन मॅनेजर, डेलॉईट), सी.ए. सोनाली कावेरी (विश्वस्त आणि मुख्य प्रशासन अधिकारी, टीईएसीएच फाउंडेशन) आणि सिद्धेश लोकरे (सामाजिक कार्यकर्ते व कॉन्टेंट क्रिएटर) यांना युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपले अनुभव व सामाजिक कार्याविषयीचे विचार उपस्थितांसमोर मांडले.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना अच्युत गोडबोले म्हणाले, “खरे राष्ट्रनिर्माणाचे कार्य हे इमारतींमधून नव्हे, तर माणुसकी, समानता आणि सन्मानातून घडते. समाजात मूल्याधिष्ठित जीवनपद्धती रुजवणे हीच आजची खरी गरज आहे.” चंद्रशेखर सेठ यांनी मनोबलच्या कार्याचे कौतुक करताना मनोबलमध्ये शिस्त आणि आपुलकी यांचा सुंदर समतोल दिसून येतो. इथे केवळ शिक्षण दिले जात नाही, तर मूल्यांची जपणूक केली जाते असे सांगितले. सिद्धेश लोकरे म्हणाले, “सामाजिक माध्यमांचा सकारात्मक आणि जबाबदार वापर केला, तर ते समाजबदलाचे प्रभावी माध्यम ठरू शकते.”

अजय मिनोचा यांनी मत व्यक्त करताना सांगितले, “ध्येय स्पष्ट असेल, शिस्त आणि सातत्य जपले गेले, तर कोणतेही यश अशक्य राहत नाही.” परिधी वर्मा यांनी नमूद केले की, “समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी संवेदनशीलतेने काम करणे हीच खरी सार्वजनिक जबाबदारी आहे.”

दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची सांगता झाली. हा कार्यक्रम केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न राहता सामाजिक जबाबदारी, समावेशन आणि संवेदनशीलतेचा संदेश देणारा ठरला. दीपस्तंभ मनोबल ही संस्था समाजातील दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना समान संधी देण्यासाठी सातत्याने कार्यरत असून समाजपरिवर्तनाची एक प्रभावी चळवळ म्हणून पुढे वाटचाल करत असल्याचे या सोहळ्यातून अधोरेखित झाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading