Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून येत्या २, ३ आणि ४ फेब्रुवारी, २०२६ दरम्यान भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सव तीनही दिवस सायं ६ वाजल्यापासून सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर येथे संपन्न होणार असून त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येईल अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी कळविली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना विभीषण चवरे म्हणाले, “भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी शास्त्रीय संगीताला एका उंचीवर नेऊन ठेवले शिवाय शास्त्रीय संगीत सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा यशस्वी प्रयत्न आपल्या हयातीत केला. त्यांच्या याच प्रयत्नांप्रती आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने पंडितजींच्या जयंतीदिनी किंवा स्मृतीदिनी भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी येत्या सोमवार दि. २ फेब्रुवारी, मंगळवार दि, ३ फेब्रुवारी आणि बुधवार दि. ४ फेब्रुवारी रोजी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.”

सोमवार दि. २ फेब्रुवारी रोजी सायं ६ वाजता सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे मानकरी असलेले उदयोन्मुख, आश्वासक, युवा गायक यश कोल्हापुरे यांच्या गायनाने महोत्सवाला सुरुवात होईल. यानंतर जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका विदुषी सानिया पाटणकर यांचे गायन रंगेल. यानंतर रसिकांना पं संतोष संत (बासरी) व डॉ. विथिका टिक्कू (संतूर) यांची वाद्य जुगलबंदी आणि एकलवादन अनुभविता येईल. पहिल्या दिवसाचा समारोप मेवाती घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं. संजीव अभ्यंकर यांच्या गायनाने होईल.

मंगळवार दि. ३ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे मानकरी असलेले ओमकार लोहार यांच्या गायनाने महोत्सवाला सुरुवात होईल. यानंतर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांचे गायन संपन्न होईल. यानंतर रसिकांना विख्यात सरोदवादक उस्ताद अली अकबर खान यांचे नातू शिराज अली खान यांचे सरोद वादन अनुभविता येईल. बनारस घराण्याचे प्रसिद्ध गायक असलेले पद्मभूषण पं. साजन मिश्रा व पं. स्वरांश मिश्रा या पिता पुत्रांच्या गायनाने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप होईल.

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात (बुधवार दि. ४ फेब्रुवारी) सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे मानकरी असलेले आळंदी येथील रामकृष्ण आध्यात्मिक संस्थेचे अविनाश पाटील व अनिल सर्जे आणि संस्थेचे विद्यार्थी यांच्या एकत्रित तबला व पखवाज वादनाने होईल. यानंतर आश्वासक गायक असलेल्या श्रीनिवास केंचे यांचे गायन रंगेल. किराणा घराण्याचे गायक पं सुधाकर चव्हाण आणि त्यांची सुकन्या शाश्वती चव्हाण या पिता पुत्रीच्या गायनाचा आस्वाद यानंतर रसिकांना घेता येईल. प्रसिद्ध व्हायोलिनवादक विदुषी कला रामनाथ यांच्या वादनाने महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाचा समारोप होईल. संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी या करणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading