Wednesday, June 10, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

भाजपच्या राक्षसी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी लोकशाही मार्गानेच विरोध करणार – खासदार प्रणिती शिंदे

सोलापूर ;

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या कारणावरून परवा झालेल्या खुनी हल्ल्यात बाळासाहेब सरवदे या युवकाचा निर्घृण खून झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच भाजपच्या कथित दडपशाहीविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर शांततेत मूक आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाच्या सुरुवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब सरवदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

या मूक आंदोलनात खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार कॉ. आडम मास्तर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हा प्रमुख अजय दासरी, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण शहरप्रमुख महेश धाराशिवकर, काँग्रेसचे प्रवक्ते अशोक निंबर्गी, कॉ. मेजर युसुफ शेख यांच्यासह स्वर्गीय बाळासाहेब सरवदे यांचे नातलग व महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी निषेध व्यक्त करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या कारणावरून झालेल्या खुनी हल्ल्यात एका निरागस युवकाचा बळी गेला आहे. या घटनेच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर लोकशाही मार्गाने शांततेत मूक आंदोलन करण्यात आले. स्वर्गीय बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण ठामपणे त्यांच्या पाठीशी आहोत.
भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पैसा आणि सत्ता यापलीकडे जाऊन आता रक्तपातावर भाजपचे राजकारण आले आहे. सोलापूरकरांना भाजपचा खरा चेहरा दिसून आला असून, सत्तेसाठी दोन कुटुंबांमध्ये भांडणे लावून एका युवकाचा बिनविरोध निवडणुकीसाठी बळी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. असे प्रकार केवळ सोलापुरातच नव्हे तर राज्यातील विविध ठिकाणी सुरू आहेत.
लोकशाही आणि संविधानाचा वारंवार अपमान होत असून, उमेदवारी भरणे व माघारी घेण्याच्या प्रक्रियेत निर्माण झालेला गोंधळ आणि ‘एबी फॉर्म’चा गैरवापर यावरून भाजप निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करत असल्याचे सिद्ध झाले आहे. या भाजपच्या दडपशाही, कटकारस्थानांविरोधात तसेच शासन-प्रशासनाच्या भूमिकेविरोधात हे मूक आंदोलन करण्यात आले असून, लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी तसेच जनसेवेसाठी राक्षसी भाजपविरोधातील लढा पुढेही अखंडपणे सुरू राहील, असा निर्धार खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रवक्ते प्रा. अशोक निंबर्गी, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, सेवादल यंग ब्रिगेड युवक अध्यक्ष विवेक कन्ना, उपाध्यक्ष अनिल मस्के, सरचिटणीस अँड. केशव इंगळे, राजन कामत, लखन गायकवाड, भीमराव शिंदे, माजी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, सुमन जाधव, गौतम मसलखांब, प्रशांत रायचूरकर, सागर उबाळे, सुभाष वाघमारे, नागेश म्याकल, शुभम यक्कलदेवी, शरद गुमटे, मनोहर माचर्ला, धीरज खंदारे, प्रभाकर सादुल, संध्या काळे, ज्योती गायकवाड, निशा मरोड, स्नेहल शिंदे, शिवाजी साळुंखे, डॉ. प्रकाश माने, पुरुषोत्तम श्रीगादी, मोहसीन फुलारी, पवन सग्गम, गणेश इंगळे, सलीमा शेख, श्रीनिवास परकीपंडला, अभिलाष अच्युगटला आदी काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading