शिंदे गटाच्या शिवसेनेतही घराणेशाही; महापालिका उमेदवारीतून वास्तव उघड
मुंबई प्रतिनिधी
घराणेशाहीवरून शिवसेना उद्धव ठाकरे गटावर सातत्याने टीका करणाऱ्या शिवसेना शिंदे गटातही महापालिका निवडणुकांच्या उमेदवारीतून घराणेशाहीला ऊत आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेषतः मुंबई महापालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांकडे पाहिल्यास हा मुद्दा ठळकपणे समोर येतो.
शिवसेना शिंदे गटाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पक्षातील अनेक आमदार, खासदार आणि माजी लोकप्रतिनिधींच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिली आहे. मुंबईत किमान आठ आमदार आणि खासदारांच्या घरातील व्यक्तींना तिकीट देण्यात आले असून, शिंदे यांना साथ देणाऱ्या माजी नगरसेवकांवरही पक्षाने विश्वास दाखवला आहे.
घराणेशाहीच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) वर टीका करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानेच उमेदवारी देताना घराणेशाहीला प्राधान्य दिल्याचे चित्र उमेदवारांच्या यादीतून दिसून येत आहे.
मुंबईतील माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या भावजय वैशाली नयन शेवाळे यांना प्रभाग क्रमांक १८३ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर आणि कन्या प्रिया सरवणकर यांना अनुक्रमे प्रभाग क्रमांक १९४ आणि १९१ मधून तिकीट देण्यात आले आहे. कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांचे चिरंजीव जय कुडाळकर यांना प्रभाग क्रमांक १६९ मधून उमेदवारी मिळाली आहे.
चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांच्या पत्नी शैला लांडे यांना तिकीट देण्यात आले असून, चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांच्या कुटुंबातील तन्वी काते आणि समृद्धी काते या दोघींनाही उमेदवारी देण्यात आली आहे. भांडुपचे आमदार अशोक पाटील यांचे पुत्र प्रशांत पाटील यांनाही तिकीट देण्यात आले आहे. खासदार रवींद्र वायकर यांची कन्या दीप्ती वायकर यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.
याशिवाय माजी आमदार मंगेश सातमकर आणि दीपकबाबा हांडे यांच्या कुटुंबीयांनाही उमेदवारी देण्यात आल्याने, शिंदे गटाच्या शिवसेनेतील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
