Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘… म्हणून निवडणुकीत झोकून देऊन करा काम’

 

राज ठाकरे यांचे आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई: प्रतिनिधी

कोणत्याही व्यक्तिगत स्वार्थापेक्षा आपल्याला मुंबई वाचवण्याचे कार्य करायचे आहे. त्यासाठी आपल्याला ही शेवटची संधी आहे. त्यामुळे कोणाला किती जागा मिळाल्या, कोणाला उमेदवारी मिळाली, न मिळाली, याचा विचार न करता मुंबई महापालिका निवडणुकीत झोकून देऊन काम करा, असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काही तास शिल्लक असताना मनसेने आपल्या कोणत्याही उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. ज्यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांना बोलावून घेऊन एबी फॉर्म देऊन अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुंबईतील आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई जिंकायची आहे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना ठासून सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मतदान यंत्राच्या जीवावर सत्ताधारी भारतीय जनता पक्ष माज करत आहे. मुंबई गिळंकृत करण्याचा त्यांचा डाव आहे. मात्र, हा डाव उधळून लावण्याची आणि मुंबई सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. व्यक्तिगत स्वार्थ साधण्यापेक्षा ही जबाबदारी पार पाडणे अधिक महत्त्वाचे आहे, असे ठाकरे यांनी मनसैनिकांना सांगितले.

आपण दीर्घकाळ सत्तेच्या बाहेर राहिलो आहोत. तरीही आपल्या पक्षाचा दबदबा आणि सामान्य नागरिकांचा आपल्यावरचा विश्वास हा कायम आहे, असा दावा ठाकरे यांनी केला. अनेक जण केवळ भीतीपोटी भाजपमध्ये जात आहेत. भाजपामध्ये गेल्यावर आपण सुरक्षित आहोत, अशी त्यांची समजूत आहे. मात्र त्यांच्यावरील टांगती तलवार कायम आहे याची जाणीव ठेवावी, असेही ठाकरे म्हणाले.

या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत मुंबई आपण राखायची आहे. आपल्याला युती धर्म पाळायचा आहे. कमी जागा मिळाल्या म्हणून नाराजी ठेवू नका. सत्तेच्या राजकारणापेक्षा मुंबईचे आणि मराठी माणसाचे हित अधिक महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने जोमाने कामाला लागा, असेही ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading