‘… प्राण पणाला लावणे हाच आमचा निवडणुकीचा अजेंडा’
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा दावा
मुंबई: प्रतिनिधी
राज्य आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून मुंबईचा सौदा करण्याचे प्रयत्न सुरू असून ते हाणून पाडण्यासाठी प्राण पणाला लावणे, हाच आमचा मुंबई महापालिका निवडणुकीचा मुख्य अजेंडा असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.
उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी मुंबईचा सौदा करण्याचे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न आहेत. ते हाणून पाडण्यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत. प्रसंगी रस्त्यावर उतरत आहोत. या संघर्षात जे आमच्या बरोबर येतील त्यांना सोबत घेऊन आणि जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय आमचा लढा सुरूच राहील, असे राऊत यांनी सांगितले.
गौतम अदानी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यातील संबंध व्यक्तिगत आणि कौटुंबिक स्वरूपाचे आहेत. मात्र, मुंबई वाचवण्यासाठीच्या लढ्यात डावे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस यांच्यासह शरद पवार यांचे नेते कार्यकर्ते ही आमच्या सोबत आहेत, असा दावाही राऊत यांनी केला.
शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती झाल्यामुळे नाराजी आणि संभाव्य बंडखोरीबाबत बोलताना राऊत म्हणाले की, जेव्हा कोणत्याही दोन पक्षांमध्ये युती होते त्यावेळी संधी न मिळणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होणे, प्रसंगी त्यांचा राग व्यक्त होणे स्वाभाविकच आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटात ती जाहीरपणे व्यक्त झाल्याचे आजपर्यंत दिसून आलेले नाही. ठाणे आणि मुंबईत ज्याप्रमाणे शिंदे गटात नाराज कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत तसे आमच्याकडे झालेले नाही, असेही राऊत म्हणाले.
काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीचे राऊत यांनी स्वागत केले. ते आमच्या सोबत नसले तरी देखील भाजपला रोखण्यास या युतीचा हातभार लागणार आहे. त्यामुळे या युतीला अपशकुन करण्यासाठी आम्ही नतदृष्ट नाही आहोत, असेही राऊत यनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद चद्र पवार पक्षाबरोबरच्या युती बाबतचा प्रश्न आम्ही आमच्याकडून सोडवला आहे. त्यांना हवे असलेल्या बहुतेक जागा आम्ही दिलेल्या आहेत. त्यांना हवे असलेल्या काही जागा मनसेकडे आहेत. त्या जागा संदर्भात राज ठाकरे यांच्याशी चर्चा करा, असे त्यांना सांगितले आहे. त्यामुळे या युतीबाबतचा प्रश्न आमच्याकडून संपला आहे, असेही राऊत म्हणाले.
