Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

कृत्रिम बुद्धिमत्ता याचा अर्थ माणसाच्या ऐवजी मशीन विचार करते असं नाही -उद्योगपती गौतम अदानी

पुणे प्रतिनिधी

कृत्रिम बुद्धिमत्ता याचा अर्थ माणसाच्या ऐवजी मशीन विचार करते असं नाही तर माणसाने मशीनला आपल्यासाठी विचार करायला लावणे आणि त्यातून प्रगती साधणे, असा असल्याचे प्रतिपादन विख्यात उद्योगपती गौतम अदानी यांनी केले. सध्याचा काळ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्रांतीचा असून विद्यार्थ्यांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःच्या आणि देशाच्या प्रगतीत हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानने स्थापन केलेल्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे उद्घाटन अदानी यांच्या हस्ते करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, प्रीती अदानी यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान विकसित झाल्यावर अनेकांना अनेक प्रकारच्या भीतीने ग्रासले आहे. त्यामध्ये माणसाची जागा मशीन घेईल आणि रोजगारांची संख्या झपाट्याने घटेल, ही भीती सर्वात मोठी आहे. मात्र, नव्या तंत्रज्ञानाची भीती न बाळगता ते आत्मसात करून त्याचा वापर मानवाच्या प्रगतीसाठी करणे आवश्यक आहे, असेही आदानी यांनी यावेळी नमूद केले.

जगात औद्योगिक क्रांती, विजेचा वापर करून मोठ्या प्रमाणावर उत्पादन, डिजिटल क्रांती आणि सध्याच्या काळात चौथी कृत्रिम बुद्धिमत्तेची क्रांती घडून आली आहे. कोणत्याही क्रांतीच्या काळाचा विचार केला तर कधीही रोजगारांची संख्या घटवलेली नाही. उलट त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, याकडे अदानी यांनी लक्ष वेधले.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावीपणे वापर करणे शक्य झाले तर समाजाच्या तळागाळातील घटकांपर्यंत ज्ञान आणि समृद्धी पोहोचविणे शक्य होणार आहे, असा दावा अदानी यांनी केला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे उत्पादनक्षमता, निर्णय घेण्याची क्षमता यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. यामुळे शेतकरी हा केवळ उत्पादक न राहता तो व्यापारी बनू शकणार आहे. शेतकऱ्याला आपल्या मातीचे, बियाणांचे, पिकांचे आरोग्य व दर्जा, बाजारपेठेची सद्यस्थिती यासह लॉजिस्टिक्स सुविधा मिळणे सहज शक्य होणार आहे.

घरगुती स्वरूपाचे उत्पादन करणाऱ्या गावागावातील महिलांना आपल्या उत्पादनाच्या आरेखनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता येणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग, उपलब्ध बाजारपेठेची माहिती, सप्लाय चेन ही सर्व माहितीही सुलभपणे उपलब्ध होऊन त्या उद्योजिका बनवू शकणार आहेत.

हे सर्व साध्य करायचे असेल तर भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे स्वतःचे डेटा सेंटर्स, मायक्रो चिप्स, त्यासाठी ऊर्जा, पायाभूत सुविधा आदी इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याची नितांत गरज आहे. हे जर आपण करू शकलो नाही तर आपल्या मनुष्यबळाचे ज्ञान, कौशल्य आणि कार्यक्षमता याचा वापर करून इतर देश त्याचा फायदा उठवण्यासाठी सज्ज असल्याची जाणीवही अदानी यांनी करून दिली.

कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी अदानी उद्योग समूहाने देखील पुढाकार घेतला असून त्यासाठी आवश्यक असलेल्या ऊर्जा निर्मिती व अन्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार असल्याचे अदानी यांनी नमूद केले. या क्षेत्राला तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सबरोबर सहकार्य करार करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

सध्याच्या काळातील एआयच्या अद्ययावत तंत्रज्ञानाचे शिक्षण प्रशिक्षण देणारी ही देशातील पहिली अशासकीय संस्था असून विद्या प्रतिष्ठानने हे ऐतिहासिक पाऊल उचलल्याचे शरद पवार यांनी अध्यक्षीय भाषणात नमूद केले. शून्यापासून सुरुवात करून उद्योग क्षेत्रात आपले साम्राज्य निर्माण करणारे गौतम अदानी हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व असून विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची माहिती व्हावी, यासाठीच आग्रहाने त्यांना आमंत्रित केल्याचे पवार यांनी नमूद केले.

यावेळी अजित पवार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. विद्या प्रतिष्ठानच्या सेक्रेटरी ॲड नीलिमा गुजर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading