… भाजपने केली मुंबईची विभागणी संजय राऊत यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप
मुंबई प्रतिनिधी
कायमच धर्म आणि प्रांतवादावर निवडणुका लढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने मुंबईचे विभाजन केले आहे, असा आरोप करून आमच्यासाठी मात्र मुंबई एक आहे. राज्याची राजधानी आहे, अशी ग्वाही शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील सहभागी असल्याचा दावाही राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. शरद पवार गटाकडून ज्या ज्या जागांवर उमेदवारी मागण्यात आली त्या त्या जागा त्यांना देण्यात आले आहेत. त्यांना आमच्या युतीची कोणतीही अडचण नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
ठाणे महापालिकेत युती करण्याबाबत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या टोकाच्या मतभेदाबाबत बोलताना संजय राऊत यांनी, ठाण्यात भाजपला शिंदे गटाचा पराभव करायचा आहे, असा धक्कादायक दावा केला. ठाणे महापालिका निवडणुकीतील लढत ही केवळ भाजप आणि शिवसेना मनसे युती अशी असल्याचे सांगत शिवसेना शिंदे गटाला गणतीत घेत नसल्याचे त्यांनी सूचित केले.
पुणे महापालिका निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत आमची मनसे आणि काँग्रेस यांच्याबरोबर चर्चा सुरू असल्याचेही राऊत यांनी सांगितले.
