Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

माऊली टाकळकर यांना यावर्षीचा वत्सलाबाई जोशी पुरस्कार जाहीर

महोत्सवादरम्यान ‘म्युझिकल स्टॅम्प्स’ अर्थात ‘संगीतमय तिकीटे’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन

रसिकांसाठी पीएमपीएमएलतर्फे यंदा देखील बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार

पुणे  : आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने देण्यात येणारा वत्सलाबाई जोशी पुरस्कार मागील ८ दशकांहून अधिक काळ कलाकारांच्या चार पिढ्यांना टाळसंगत करणाऱ्या पुण्याच्या माऊली टाकळकर यांना जाहीर करण्यात आला असल्याची घोषणा मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी केली.

भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या कलाकारांना, साथसंगतकारांना २००७ सालापासून मंडळाच्या वतीने दरवर्षी वत्सलाबाई जोशी पुरस्काराने गौरविण्यात येते. रोख रु. ५१ हजार व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडांगण येथे १० ते १४ डिसेंबर दरम्यान होणा-या ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

माऊली टाकळकर यांचा जन्म ११ एप्रिल १९२७ रोजी झाला असून आज ते ९९ वर्षांचे आहेत. कलाकारांच्या चार पिढ्यांना सातत्याने लयबद्ध टाळसाथ करणाऱ्या माऊली टाकळकर यांची प्रत्येक टाळसाथ ही लयबद्ध आणि भक्तिरंग निर्माण करणारी असते. माऊली टाकळकर यांनी माधवबुवा सुकाळे यांच्याकडे जवळपास १० वर्षे टाळवादनाचे शिक्षण घेतले, पुढे ते पखवाज वादन शिकले, पण ते खऱ्या अर्थाने रमले ते टाळ वादन करण्यात. त्यांनी बालगंधर्वांना देखील टाळसाथ केली असून भारतरत्न पं. भीमसेन जोशींना ४० वर्षे टाळांची साथ केली. पं भीमसेन जोशी यांसोबत त्यांनी जगभर दौरे केले. आपल्या टाळवादनाने अनेक दिग्गज व आंतरराष्ट्रीय कलाकारांना त्यांनी गेली ४ दशकाहून अधिक साथ केली आहे. पंडित भीमसेन जोशी यांच्या ‘संतवाणी’ चे जवळजवळ २५०० हून अधिक कार्यक्रमात जगभरात सर्व ठिकाणी माऊली टाकळकर यांनी त्यांना साथ केली आहे. माऊली यांचा अपूर्व उत्साह, तरुणांना लाजवेल अशी ऊर्जा आजही सर्वांना अचंबित करणारी अशीच आहे.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील आणखी एक महत्वाचे आकर्षण म्हणजे प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांच्या वतीने सादर होत असलेले खास प्रदर्शन. मागील १७ वर्षांपासून पाकणीकर हे विशिष्ट संकल्पनेवर आधारित असे प्रदर्शन महोत्सवादरम्यान सादर करत असतात. ‘म्युझिकल स्टॅम्प्स’ अर्थात ‘संगीतमय तिकीटे’ हे त्यांचे यावर्षीचे प्रदर्शन असणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना पाकणीकर म्हणाले, “जगभरातील लाखो लोकांचा, तरुणांचा आणि वृद्धांचा एक लोकप्रिय सार्वत्रिक छंद म्हणजे टपाल तिकिटांचा संग्रह करणे, त्यांची व्यवस्थित मांडणी करणे आणि अर्थातच देवाण-घेवाण करणे हा होय. या छंदात इतिहासाचे आकर्षण, कुतूहल आहेच आणि त्याचबरोबर असे शैक्षणिक मूल्य आहे जे इतर कोणत्याही छंदांपेक्षा वेगळे आहे. या छंदाची व्याप्ती मानवी मनाच्या सीमांइतकीच विस्तृत आणि मनोरंजकही आहे. टपाल तिकिटे गोळा करताना जगाचा चित्रमय इतिहास पाहता येतो. टपाल तिकिटांवर महान लोक, इतिहासकार, कलाकार, शास्त्रज्ञ या सर्वांचे स्मरण केले जाते. प्राण्यांचे राज्य, फुले, विज्ञान, कला, उद्योग आणि इतर अनेक विषयांचे वर्णन टपाल तिकिटांवर चित्रित झालेले दिसते. त्यामुळे यंदाच्या प्रकाशचित्र प्रदर्शनाचा विषय आहे – ‘टपाल तिकीटे’ आणि प्रदर्शनाचे नाव आहे- ‘म्युझिकल स्टॅम्प्स’ अर्थात ‘संगीतमय तिकीटे’.”

या प्रदर्शनात प्रामुख्याने १९४७ नंतर म्हणजे आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारकडून जी टपाल तिकीटे प्रसिद्ध करण्यात आली त्यातील अभिजात शास्त्रीय संगीतातील कलाकार, नृत्य कलाकार, वाद्ये व याच्याशी संबंधित संस्थांवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या टपाल तिकिटांचा समावेश करण्यात आला आहे, असेही पाकणीकर यांनी नमूद केले. तिकिटांवरील व्यक्ती, संस्था, त्यांचे कार्य, त्या तिकीटांचे डिझाईन, रंगसंगती या गोष्टी रसिकांना एका वेगळ्याच संगीतमय विश्वाची सफर घडवतील. ‘सवाई’ स्वर कानात साठवतानाच या दृश्य मेजवानीने त्यांची मनेही तृप्त होतील, असा विश्वासही पाकणीकर यांनी व्यक्त केला.

दरवर्षीप्रमाणे महोत्सवाच्या प्रत्येक दिवशी महोत्सवानंतर नागरिकांना घरी जाण्यासाठी मुकुंदनगरपासून भक्ती शक्ती चौक- निगडी, सिंहगड रस्ता, मारुती मंदिर- धायरी, कोथरूड डेपो- पौड रस्ता, आणि वारजे माळवाडी या मार्गांवर बससेवा पीएमपीएमएलतर्फे उपलब्ध करून देण्यात येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading