Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

कसदार गायन आणि विलोभनीय कथक नृत्य प्रस्तुतीने रंगला सूर महती महोत्सवाचा दुसरा दिवस

पुणे : डॉ वीणा सहस्त्रबुद्धे यांचे शिष्य अतुल खांडेकर यांचे कसदार शास्त्रीय गायन आणि पं. बिरजू महाराज यांचे शिष्य असलेल्या देवेश मिरचंदानी यांच्या कथक नृत्याच्या प्रस्तुतीने सूर महती महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस रंगला. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी दोन दिवसीय सूर महती महोत्सव संपन्न होत असून आजच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात अतुल खांडेकर यांच्या गायनाने झाली. डॉ हरी सहस्त्रबुद्धे, ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर, पंडित विनायक तोरवी, सूर महती फाऊंडेशनचे रवींद्र व मानसी खांडेकर, अतुल खांडेकर व भक्ती खांडेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या लिबरल आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी गायन सादरीकरण झाले.

अतुल खांडेकर यांनी राग भीमपलासचे बहारदार सादरीकरण करीत गायनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी ‘रे बिरहा बामना…’ हा ख्याल आणि ‘पिया पास ले जा…’ ही बंदिश गायली. यानंतर त्यांनी तराणा सादर केला. उत्तरार्धात त्यांनी राग हेमंत ची प्रस्तुती केली. यामध्ये त्यांनी ‘हमरी सुध ली जे मुरारी…’ आणि ‘तन मन धन कर अर्पण गुरू चरण मैं…’ या दोन बंदिशी गायल्या. पद्मश्री जयमाला शिलेदार यांना जन्मशताब्दी निमित्त आदरांजली वाहत अतुल खांडेकर यांनी ‘माई मैने गोविंद लिनो मोल…’ हे नाट्यपद सादर करीत आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. अतुल खांडेकर यांना प्रणव गुरव (तबला), लीलाधर चक्रदेव (संवादिनी), भक्ती खांडेकर व श्रीज दाणी (तानपुरा) यांनी साथ संगत केली.

यानंतर पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांचे शिष्य असलेल्या देवेश मिरचंदानी यांनी कथक नृत्य प्रस्तुतीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पारंपरिक बंदिशीतील शंकर स्तवनाने त्यांनी आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी नाशिकच्या प्रख्यात गुरु विद्याहरी देशपांडे यांची ‘शंकर गिरिजापती महादेव…’ ही रचना सादर केली. यानंतर त्यांनी ताल पंचम सवारीमध्ये काही रचनांची प्रस्तुती केली. या सर्व रचना देवेश यांनी २०१८ साली स्वतः पंडित बिरजू महाराज यांच्याकडून शिकल्या असल्याची आठवण त्यांनी सांगितली. गझल आणि सरगम यांवरील सादरीकरणाने त्यांनी समारोप केला. देवेश यांना शुभम खंडाळकर (गायन व संवादिनी), कौशिक केळकर (तबला), सुनील अवचट (बासरी), अनिरुद्ध जोशी (सतार) आणि श्रुती पत्की (पढंत) यांनी साथसंगत केली.

यानंतर सदर वर्ष हे गुरू पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष असून यानिमित्त त्यांना वंदन करणारा, सूर महती फाउंडेशन निर्मित ‘पारिजात फुलला’ हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. स्वानंद पटवर्धन यांनी संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading