२९ व ३० नोव्हेंबर दरम्यान सूर महती महोत्सवाचे आयोजन
पुणे : ख्यातनाम गायिका, संगीतकार डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांचे शिष्य आणि प्रसिद्ध गायक अतुल खांडेकर यांच्या सूर महती फाउंडेशनच्या वतीने शनिवार दि. २९ आणि रविवार दि. ३० नोव्हेंबर दरम्यान सूर महती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा अतुल खांडेकर व भक्ती खांडेकर यांनी केली. महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून शनिवारी सायं. ५ ते रात्री १० तर रविवारी दुपारी ४.३० ते रात्री १० या वेळेत स्वारगेट येथील नेहरू स्टेडीयम शेजारील गणेश कला क्रीडा मंच येथे महोत्सव संपन्न होईल, अशी माहितीही खांडेकर यांनी दिली.
सूर महती महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्यासाठीच्या विनामूल्य प्रवेशिका या २२ नोव्हेंबर, २०२५ पासून कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर, नारायण पेठ येथील पुणे मराठी ग्रंथालय आणि टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठ या ठिकाणी उपलब्ध असतील याची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
माझ्या गुरु डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने आम्ही दरवर्षी सूर महती महोत्सव आयोजित करीत असतो. या निमित्ताने स्व. डॉ वीणा सहस्त्रबुद्धे यांचे शास्त्रीय संगीतातील योगदान, त्यांनी जपलेली व पंडित विष्णू दिगंबर पलूसकर यांच्यापासून चालत आलेली संगीताच्या प्रचार आणि प्रसाराची परंपरा अधिकाधिक रसिक श्रोत्यांपर्यंत आणि संगीताच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे अतुल खांडेकर म्हणाले. याशिवाय सदर वर्ष हे माझ्या आणखी एक सांगीतिक गुरु पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष असून यानिमित्त त्यांना वंदन करणारा, सूर महती फाउंडेशन निर्मित ‘पारिजात फुलला’ हा लघुपट आम्ही प्रदर्शित करीत असून त्याचे लोकार्पण देखील यावर्षीच्या महोत्सवात केले जाईल, असे खांडेकर यांनी सांगितले.
सूर महती महोत्सवाची सुरुवात शनिवार दि. २९ नोव्हेंबर रोजी सायं ५ वाजता प्रसिद्ध व्हायोलिनवादक गुरु पं. मिलिंद रायकर यांचे शिष्य व सुपुत्र, युवा व्हायोलिन वादक यज्ञेश रायकर यांच्या व्हायोलिन वादनाने होईल. यानंतर पं काशिनाथ बोडस आणि डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या शिष्या असलेल्या अमेरिकास्थित रचना बोडस यांचे शास्त्रीय गायन संपन्न होईल. ग्वाल्हेर आणि किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. विनायक तोरवी यांच्या शास्त्रीय गायनाने पहिल्या दिवसाचा समारोप होईल.
रविवार दि. ३० नोव्हेंबर रोजी सायं ४.३० वाजता महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात अतुल खांडेकर यांच्या शास्त्रीय गायनाने होईल. त्यानंतर पं. बिरजू महाराज यांचे शिष्य असलेले प्रसिद्ध नर्तक, संरचनाकार देवेश मिरचंदानी यांच्या कथक नृत्याची प्रस्तुती होईल. गुरु पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दीचे वर्षानिमित्त त्यांना वंदन करणारा, सूर महती फाउंडेशन निर्मित ‘पारिजात फुलला’ हा लघुपट यानंतर प्रदर्शित करून त्याचे लोकार्पण संपन्न होईल. तर ज्येष्ठ गायिका डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांच्या सुरेल गायनाने सूर महती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप होईल.
याबरोबरच सूर महती महोत्सवामध्ये उपशास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदानाबद्दल डॉ. संजीव शेंडे यांचा तर मोठ्या प्रमाणात गोसेवा करणाऱ्या सुरभी सेवा परिवार या संस्थेचा मानपत्र देऊन सन्मान केला जाईल.
सूर महती महोत्सवादरम्यान लीलाधर चक्रदेव, प्रणव गुरव, शुभम खंडाळकर, कौशिक केळकर, अनिरुद्ध जोशी, सुनील अवचट, श्रुती पत्की, सुयोग कुंडलकर आणि भरत कामत हे कलाकार साथसंगत करतील तर स्वानंद पटवर्धन हे संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन करतील.
