Friday, April 3, 2026
Latest NewsPUNE

बाल दिनानिमित्त बालगुन्हेगारी रोखण्यासाठी “व्यसनमुक्तीसह कायदा व पुनर्वसनाचे धडे”

निर्भय विद्यार्थी अभियान व पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांचा विशेष उपक्रम

पुणे – बाल दिनाचे औचित्य साधून पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत निर्भय विद्यार्थी अभियान व पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या संकल्पनेतून विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी ” बाल गुन्हेगारी व व्यसनमुक्ती ” या विषयावर विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येरवडा पोलीस स्टेशन येथे आयोजित या कार्यक्रमाला शासनाच्या महिला बालविकास विभागाचे प्रकल्प संचालक तथा विधी अधिकारी ऍड. अश्विन जगताप, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे समुपदेशक नीरज शेवडे, निर्भय विद्यार्थी अभियानचे निखिल गायकवाड,सीवायडीए संस्थेचे समुपदेशक कौस्तुभ व प्रिया तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल डबडे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक श्रीमती सीमा ढाकणे, पोलीस निरीक्षक मंगेश हांडे, पोलीस निरीक्षक विक्रम सिंह कदम, पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्यासह परिमंडळ चार विभागातील विधी संघर्षग्रस्त बालके त्यांचे पालक तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी मुक्तांगणचे नीरज शेवडे यांनी बाल वयात व्यसनाच्या चुकीच्या सवयीमुळे झालेल्या चुका, गुन्हेगारीतील समावेश त्यामुळे आयुष्यात निर्माण होणारे गुंतागुंतीचे प्रश्न याविषयी स्व -अनुभवातून उपस्थितांसमोर कथन केले. व्यसनांपासून तसेच गुन्हेगारी कृत्यांपासून दूर राहण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सीवायडीए संस्थेचे समुपदेशक कौस्तुभ यांनी संस्थेच्या विधी संघर्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेले उपक्रमांची माहिती दिली. उपक्रमाचा जास्तीत जास्त बालकांनी लाभ घ्यावा असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

प्रिया यांनी उपस्थितांशी संवाद साधताना वस्ती पातळीवर अल्पवयीन बालकांमधील वाढती व्यसनाधीनता तसेच त्यांच्याकडून होणारे गुन्हे याचे भीषण वास्तव कथन करून ही गंभीर सामाजिक समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले. महिला बालकल्याण विभागाचे विधी अधिकारी ऍड. अश्विन जगताप यांनी विधी संघर्ष बालकांसाठी चे कायदे यामधील नवीन तरतुदी याबद्दल कायदेशीर मार्गदर्शन केले. समाजात वाढत्या बालगुन्हेगारी बद्दल विभागाच्या वतीने नवीन कठोर कायद्यांचे लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार असून विधी संघर्षग्रस्त बालकांनी गुन्हेगारी कृत्यांपासून दूर राहावे असे आवाहन केले. शासनाचा महिला व बालविकास विभाग, पोलीस विभाग तसेच विविध सामाजिक संस्था यांच्या मदतीने बालकांसाठी अनेक संधी उपलब्ध असून त्याचा लाभ घ्यावा असे देखील सांगितले. बालकांमध्ये वाढती व्यसनाधीनता व गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी पोलिसांच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू असून समाजातील सुज्ञ नागरिक तसेच सामाजिक संस्था यांनी देखील यासाठी पुढाकार घ्यावा असे मत सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे यांनी व्यक्त केले. अल्पवयीन वयात बालकांकडून होणारे गुन्हे रोखण्यासाठी पालकांनी जागरूक राहून भविष्यात ते गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जाणार नाहीत यासाठी दक्ष रहावे असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांनी व्यक्त केले.

समाजातील वाढती बाल गुन्हेगारी व व्यसनाधीनता रोखण्यासाठी निर्भय विद्यार्थी अभियान यांच्यावतीने सातत्याने उपक्रम सुरू असून आगामी काळात या संदर्भातील संयुक्त प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे निखिल गायकवाड यांनी सांगितले.समाजातील वाढती व्यसनाधीनता व बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी निर्भय विद्यार्थी अभियान यांच्या वतीने लवकरच नियोजनबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी सांगितले.प्रास्ताविक व स्वागत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी केले आभार सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल डबडे यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading