छत्रपती शिवरायांच्या गोष्टी सांगत घडला नवा गिनेस विश्वविक्रम
पुणे : हिवाळ्यात शेकोटीची उब घेत रंगलेल्या गप्पा गोष्टी आपल्या सर्वांनाच आवडतात. याच माध्यमाचा वापर करत पुण्यातील ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीच्या (डीपीईएस) खराडी कॅम्पसमध्ये ‘लार्जेस्ट ऑडियन्स अॅट कँम्पफायर स्टोरीटेलिंग’ अर्थात ‘शेकोटीच्या बाजूला झालेल्या कथाकथनासाठी उपस्थित सर्वात मोठा श्रोतवृंद’ असा नवीन गिनेस विश्वविक्रम रचला गेला.
छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित १२ किल्ल्यांना नुकतेच युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले आहे. डीपीईएसच्या खराडी कॅम्पसमध्ये तयार केलेल्या एका मोठ्या शेकोटीभोवती प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी शिवराय व या किल्ल्यांसंबंधी केलेल्या कथाकथन कार्यक्रमात तब्बल ४६२३ श्रोत्यांनी सहभाग नोंदवला. ज्यामध्ये विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा समावेश होता.
सदर विश्वविक्रमाच्या पाहणीसाठी खास लंडनहून पुण्याला पंच म्हणून आलेले गिनीस वर्ल्ड रेकॉर्डसचे वरिष्ठ अॅडज्युडिकेटर प्रवीण पटेल यांच्या हस्ते ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सागर ढोले पाटील यांना नवा गिनेस विश्वविक्रम रचल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
याविषयी बोलताना सागर ढोले पाटील म्हणाले, “काही महिन्यांपूर्वी छत्रपतीच्या शिवाजी महाराजांशी संबंधित १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत स्थान मिळाले. या निमित्ताने सदर किल्ल्यांचे महत्व व शिवरायांचे कर्तृत्व नव्या पिढीपर्यंत पोहचावे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम हाती घेतला व शिवरायांच्या प्रेरणेने तो राबवण्यात आम्हाला यश आले.”
कँम्पफायर स्टोरीटेलिंग ही संकल्पना जगभरातील गिर्यारोहकांमध्ये लोकप्रिय आहे आणि याच श्रेणीमध्ये गिनेस विश्वविक्रम केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे हे अद्वितीय किल्ल्यांची माहिती देशांतर्गत व देशाबाहेरील गिर्यारोहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असे मत सागर ढोले पाटील यांनी व्यक्त केले.
एक वर्षाच्या आताच ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीने केलेला हा तिसरा गिनेस विश्वविक्रम आहे. याआधी ८ तासांमध्ये सर्वात जास्त म्हणजेच १००० व्यक्तींना कृत्रिम अवयव बसवणे व गणेशोत्वाच्या काळात सर्वाधिक १७२४ नागरिकांच्या सहभागाने दिवे ओवाळून एकत्रित आरती करणे असे दोन गिनेस विश्वविक्रम ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीच्या नावावर आहेत.
