बकोरी रोड संदर्भात पीएमआरडीए व पीएमसीकडून लेखी आश्वासनानंतर पाचव्या दिवशी उपोषणकर्ते अनिलकुमार मिश्रा यांनी उपोषण सोडले
वाघोली : बकोरी रोडच्या समस्येबाबत मागील पाच दिवसांपासून बकोरी फाटा येथे टीम वाकोच्या वतीने सुरू असलेले आमरण उपोषण आंदोलन उपोषणकर्ते अनिलकुमार मिश्रा सोडले.
पीएमआरडीए व पीएमसीच्या वतीने मागण्यांचे लेखी उत्तर मिळाल्यानंतर मिश्रा यांनी बकोरी रोडवर अपघातग्रस्त झालेली वृद्ध व्यक्ती, पोलीस निरीक्षक युवराज हांडे व उपस्थितांच्या हस्ते ज्यूस पिऊन पाचव्या दिवशी सायंकाळी उशिरा उपोषण सोडले. यावेळी उपस्थित नागरिकांनी जल्लोष केला, फटाके उडवून व नाचून आनंद व्यक्त केला.
मागील अनेक वर्षांपासून बकोरी रोडवर प्रवास करीत असताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. प्रशासनाकडे नागरिकांनी, लोक प्रतिनिधींनी पाठपुरावा करूनही या रस्त्याचा प्रश्न लागत नाही. न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या या रस्त्यामुळे प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहे. या रोडसंदर्भात टीम वाको च्यावतीने आमरण उपोषण आंदोलन १३ सप्टेंबर पासून सुरु करण्यात आले होते. अनिलकुमार मिश्रा यांनी उपोषणाला सुरुवात केल्यानंतर बकोरी रोडवरील नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. उपोषणाच्या चौथ्या दिवशी पीएमआरडीए आणि पीएमसीच्या अधिकाऱ्यांनी रोडची पाहणी केली. पीएमआरडीएच्या वतीने सदरचा रोड महापालिकेला हस्तांतरित करण्यात
आला तर बिल्डरला रस्ता उपलब्ध करून देण्याबाबत नोटीस काढण्यात आली. पीएमसीने दिलेल्या लेखी पत्रामध्ये दोन महिन्यात डीपीआर, निधी उपलब्ध तीन महिन्यात कामाला सुरुवात, न्यायालयीन दावे निकाली लागल्यावर तसेच भूसंपादन झाल्यानंतर रस्ता एक वर्षात करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. रस्त्यासाठी आवश्यक जागा पीएमआरडीए एफएसआय/टीडीआर च्या माध्यमातून उपलब्ध करून देऊन पीएमसी रस्ता करणार आहे.
