अजित पवार यांच्यावर मित्र पक्षातील आणि स्वपक्षातील स्वकीयांनीच डाव केल्याची शंका
मुंबई प्रतिनिधी
वाळू तस्करी प्रकरणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिलेल्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मित्र पक्षातील आणि स्वपक्षातील स्वकीयांनीच डाव केल्याची शंका त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
आपल्याच मित्रपक्षातील नेत्यांवर मीडिया ट्रायल चालविण्यापेक्षा राज्याच्या नेतृत्वाने शेतकरी, युवक यांच्यासमोर असलेल्या समस्या, महिला सुरक्षेचा प्रश्न सोडविण्यासाठी, भ्रष्टाचाराच्या ज्या प्रकरणांचे पुरावे पुढे आले आहेत, त्याच्या तपासासाठी अधिक कर्तृत्व दाखवावे, असा सल्ला देत रोहित पवार यांनी सूचकपणे भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवले आहे.
चहापेक्षा किटली गरम, अशा पद्धतीचे दोन-तीन नेते आपल्या आजूबाजूला असतील तर कितीही आमदार आपल्या बाजूने असले तरी देखील फारसे काही करता येत नाही, याची प्रचिती सुद्धा अजित पवार यांना आतापर्यंत आलेली असेल, अशा शब्दात रोहित पवार यांनी आपल्या काकांनाही कानपिचक्या दिल्या आहेत.
अजित पवार यांची आक्रमकपणे बोलण्याची शैली आणि कच्चे असलेली हिंदी यामुळे हा घोळ झाल्याचा दावा रोहित पवार यांनी यापूर्वी देखील केला होता. मात्र, खुद्द अजित पवार यांनी स्पष्टीकरण देऊनही काही प्रामाणिक पण पक्षपाती समाजसेवकांना हाताशी धरून अजित पवार यांच्या विरोधात मीडिया ट्रायल चालवली जात आहे हे नक्की, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
