रेल्वे मंत्रालय आणि बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी दिली शिवसृष्टीला भेट
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांची दृष्टी सत्यात दाखविणारी शिवसृष्टी पाहण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच आंबेगाव बुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीला भेट दिली. यावेळी पर्यटन आणि मार्केटिंग विभागाचे संचालक राहुल हिमालियन, पर्यटन विभागाच्या महाव्यवस्थापिका प्रोमिला गुप्ता, पश्चिम मुंबई विभागाचे महा व्यवस्थापक गौरव झा, अतिरिक्त महा व्यवस्थापक डॉ. अचूत सिंग, रथीश चंद्रन आर, पुणे व सोलापूर विभागाचे विभाग अधिकारी गुरुराज सोन्ना उपस्थित होते. शिवसृष्टी प्रकल्पाची निर्मिती करणाऱ्या छत्रपती महाराजा प्रतिष्ठानचे विश्वस्त व शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष असलेले जगदीश कदम, विश्वस्त अमृत पुरंदरे आणि प्रकल्पाचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार हे देखील यावेळी उपस्थित होते.
याबरोबरच पुण्यातील बालभारती संस्थेच्या अधिकारी वर्गाने देखील शिवसृष्टीला भेट दिली यामध्ये संचालक कृष्णकुमार पाटील, वित्त व लेखा अधिकारी शुभांगी माने, बालभारतीच्या किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे, साठा व वितरण व्यवस्थापक दत्तात्रय दिघे, विशेषाधिकारी केतकी जानी, ग्रंथपाल प्रशांत धामापूरकर, विधी अधिकारी रवींद्र माने, सहायक विशेषाधिकारी वर्षा सरोदे आणि सहायक संशोधन अधिकारी निकम यांचा समावेश होता.
या सर्व अधिकाऱ्यांनी यावेळी शिवसृष्टीमधील दुर्गवैभव’, ‘रणांगण’ ही दालने, महाराजांच्या आग्राहून सुटकेचा थरार उभा करणारे दालन, प्रत्यक्ष शिवराय आपल्याशी संवाद साधत असल्याचा अनुभव देणारे श्रीमंत योगी हे दालन, राज्याभिषेकाचा देखावा असलेला ‘सिंहासनाधिश्वर’ हे दालन यांना भेट दिली. छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी, त्यांना असलेला स्वभाषा, स्वराज्य आणि स्वधर्माचा अभिमान, त्यांच्यावर आलेली संकटे आणि या सर्वांवर मात करून त्यांनी उभारलेले स्वराज्य या सर्वांची माहिती शिवसृष्टीच्या माध्यमातून पाहताना अंगावर शहारे आल्याचे सर्वांनी सांगितले.
याबरोबरच शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्य आकर्षण असलेले टाइम मशीन थिएटर आणि महाराजांच्या काळात काढलेल्या व सध्या जगातील प्रसिद्ध संग्रहालयांमध्ये असलेल्या चित्रांच्या (पेंटिंग्ज) हाय रेझोल्युशन इमेजेसच्या प्रिंट्सही या सर्वांनी पाहिल्या. ‘लीडिंग फ्रॉम द फ्रंट’ अशी ख्याती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हयातीत खूप लढायांचे नेतृत्व केले. त्यातील आपल्याला फारशी माहिती नसलेल्या लढायांची माहिती घेताना जणू शिवकाल समोर उभा ठाकल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. छत्रपती घराण्याचे कुलदैवत असलेल्या तुळजा भवानी मातेचे मंदिर आणि गंगासागर तलाव याचे देखील दर्शन या सर्वांनी घेतले.
