Wednesday, May 20, 2026
Latest NewsPUNE

रसिकांनी अनुभवले परिपक्व ध्रुपदगायन आणि रंगतदार ख्यालगायन

पुणे : पं. उदय भवाळकर यांच्या परिपक्व ध्रुपदगायनाने आणि विदुषी आरती अंकलीकर टिकेकर यांच्या सुरेल गायनाने भारलेली ‘संगीत संध्या’ रसिकांनी अनुभवली.

सवाई गंधर्वांचे नातू आणि भारतरत्न स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य पं. श्रीकांत देशपांडे यांच्या स्मृतीस उजाळा देत त्यांना अभिवादन करण्याच्या उद्देशाने शीला देशपांडे आणि पं. श्रीकांत देशपांडे मित्रमंडळ यांच्या वतीने या विशेष संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे झालेल्या या ‘संगीत संध्या’  मैफिलीसाठी सर्वांना मुक्त प्रवेश होता.

प्रारंभी ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाॅं यांच्या हस्ते पं. उदय भवाळकर यांचा सन्मान करण्यात आला. आयोजक शीला देशपांडे यांनी उस्ताद उस्मान खाॅं यांचे स्वागत केले.

उस्ताद उस्मान खाॅं म्हणाले, “या स्मृती मैफलीचे हे १३ वे वर्ष आहे. श्रीकांत देशपांडे हा माझा सख्खा मित्र होता. आम्ही अनेकदा एकत्र कार्यक्रम केले, ते दिवस वेगळेच होते. आता त्या दिवसांच्या आठवणी बनून मनात आल्या आहेत. स्मृती मैफलीचा हा उपक्रम असाच सुरू रहावा,”.

पं. उदय भवाळकर म्हणाले,”मी पुण्यात आल्यावर १९९७ साली पं. श्रीकांत देशपांडे यांच्याशी परिचय झाला आणि त्याच वर्षी मी सवाई गंधर्व संगीत महोत्सवात प्रथम गायिलो. तेव्हापासून अतिशय प्रेमाने तानपुरे लावून देणे, सर्व व्यवस्था पाहणे त्यांनी केले होते. त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन नेहमीच लाभले,”

यावेळी ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर, व्हायोलिन वादक पं. अतुल कुमार उपाध्ये, संवादिनी वादक पं. प्रमोद मराठे, तबलावादक पं. पांडुरंग मुखडे, गोविंदराव बेडेकर, उल्हासदादा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रसिद्ध धृपद गायक पं. उदय भवाळकर यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग  ‘यमन’ने केली. सविस्तर आलाप, नोमतोम यातून रागरूप यथार्थ उभे करून त्यांनी शूल तालात निबद्ध रचना सादर केली. ‘तुमबिन कौन मेरो’ ही कलावती रागातील बंदिश सादर करून पं. भवाळकर यांनी आपल्या गायनाची सांगता केली. त्यांना प्रताप आव्हाड यांनी पखवाज वर अनुरूप साथ केली.

उत्तरार्धात सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी आरती अंकलीकर टिकेकर यांनी राग ‘शामकल्याण’ ने प्रारंभ केला. ‘सो जा रे राजा’ ही झपतालातील बंदिश, त्याला जोडून ‘ रे बनरा’ ही त्रितालातील रचना आणि एकतालातील तराणाही त्यांनी पेश केला. त्यानंतर ‘दिल बहार’ हा भैरवी टप्पा आणि ‘भैरवी प्रियदर्शिनी’ ही गाजलेली भैरवी बंदिश मोजक्या वेळात पण ढंगदारपणे सादर करत, त्यांनी या संगीत संध्येची सुरेल सांगता केली. त्यांना भरत कामत (तबला) आणि सुयोग कुंडलकर (संवादिनी) तर अनुराधा मंडलिक आणि श्रद्धा गद्रे यांनी तानपुरा व स्वरसाथ केली. रवींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading