बॉम्बच्या धमकीने Air India चे विमान माघारी फिरले
नवी दिल्ली: वृत्तसंस्था
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या दुसऱ्याच दिवशी एअर इंडियाचे विमान फुकेत येथून उड्डाण करून अंदमान नजीक येत असताना ते बॉम्बने उडविण्याची धमकी दूरध्वनीवरून देण्यात आल्याने ते पुन्हा मागे वळविण्यात आले. फुकेत. विमानतळावर सर्व १५६ प्रवाशांना सुरक्षितपणे उतरविले असून विमानाची तपासणी केली जात आहे.
आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास फुकेत येथून नवी दिल्ली येथे निघालेल्या AI ३७९ या विमानाने उड्डाण केले. हे विमान अंदमानच्या समुद्रावरून प्रवास करीत असतानाच बॉम्बची धमकी देणारा दूरध्वनी आल्यामुळे ते फुकेत विमानतळाकडे परत आणण्यात आले. सर्व प्रवासी सुरक्षित असून विमानाची कसून तपासणी केली जात आहे.
इस्राएल इराण संघर्षामुळे हवाई वाहतूक विस्कळीत
इस्रायलने इराण वर केलेल्या जोरदार हल्ल्यामुळे आणि इराणकडून त्याचे प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन दोन्ही देशांनी आपापल्या हवाई हद्दी बंद केल्या आहेत. त्यामुळे अनेक भारतीय विमानांनी देखील आपले मार्ग बदलले आहेत किंवा अनेक मार्गांवरील विमाने रद्द करण्यात आली आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी जाणारी किमान २० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे.
