Wednesday, May 20, 2026
Latest NewsLIFESTYLEPUNE

व्हीनस कला महोत्सव १० ते १५ जून दरम्यान

कलाकार, विद्यार्थी, कला प्रेमी यांसाठी अनेकविध कार्यक्रमांची पर्वणी

पुणे : एकाच छताखाली कलेचा मनमुराद आस्वाद घेण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. निमित्त आहे येत्या मंगळवार दि. १० ते रविवार दि. १५ जून दरम्यान घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे आयोजित व्हीनस कला महोत्सवाचे. सदर महोत्सवाचे हे ११ वे वर्ष असून सकाळी ११ ते सायं ७ पर्यंत ते सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल, याची कृपया नोंद घ्यावी.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महोत्सवामध्ये कला प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, अनेकविध कार्यशाळा यांचे रेलचेल असेल असे सांगत व्हीनस कला महोत्सवाचे आयोजक सुरेंद्र करमचंदानी म्हणाले, “आम्ही कला क्षेत्राशी जोडले गेलो असल्याने नेहमीच कलाकारांशी आमचा जवळचा संबंध येत असतो. प्रत्येक वयोगटातील कलाकारांसाठी एक हक्काचे आणि सामाईक व्यासपीठ असावे या कल्पनेतून ११ वर्षांपूर्वी या कला महोत्सवाची संकल्पना समोर आली. सदर वर्ष हे ११ वे वर्ष असून विविध कार्यक्रम, कार्यशाळा, प्रदर्शन यांसोबतच व्यावसायिक कलाकार, हौशी कलाकार, कला शाखेचे विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थी यांच्या चित्रांचे प्रदर्शन या दरम्यान पाहता येणार आहे.”

या कला महोत्सवा अंतर्गत १० जून रोजी सायं ५ वाजता महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न होईल. यावेळी पुणे महानगर पालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त सुनील बल्लाळ आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुनील इंगळे हे देखील उपस्थित असतील. सुप्रसिद्ध लेखक पु ल देशपांडे यांना मानवंदना देण्याच्या उद्देशाने त्यांची स्वाक्षरी असलेल्या व्हिंटेज पेनच्या सिग्नेचर एडिशनचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न होईल. याबरोबरच चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण देखील यावेळी संपन्न होणार असल्याची माहिती करमचंदानी यांनी दिली.

महोत्सवा अंतर्गत १३ ते १५ जून दरम्यान कॅमलिन, पॅन आर्ट, प्रीमियम अशा पेनांसाठीच्या शाईचे प्रदर्शन इच्छुकांना पाहता येईल. याबरोबरच अर्बन स्केचर्स पुणे, पोर्टेट गृप, संस्कार भारती या संस्थांच्या वतीने विविध कार्यशाळा महोत्सवादरम्यान घेण्यात येणार असून पुणेकरांना त्यामध्येही सहभाग घेता येणार आहे.

महोत्सवादरम्यान आयोजित चित्रकला स्पर्धेसाठी व्यावसायिक कलाकार, हौशी कलाकार, कला शाखेचे विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थी या चार गटांमधून चित्रांची नोंदणी आली असून, यांपैकी निवडक १५० हून अधिक चित्रे ११ ते १५ जून दरम्यान असलेल्या प्रदर्शनीमध्ये प्रदर्शित केली जातील. त्यानुसार प्रत्येक गटात तीन उत्कृष्ट चित्रांना रोख पारितोषिकेही देण्यात येतील, असेही करमचंदानी म्हणाले. व्हीनस  ट्रेडर्सच्या ५१ व्या वर्षपूर्तीनिमित्त सदर कला महोत्सव आयोजित करण्यात येत आहे, हे विशेष.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading