Wednesday, May 20, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

गिरीश महाजन हे पक्ष फोडण्याच्या कामासाठी नेमलेले दलाल – खासदार संजय राऊत

मुंबई: प्रतिनिधी

टेंडरबाजी आणि खंडणीखोरी यातून माया जमवून पक्ष फोडणे हे भारतीय जनता पक्षाचे काम असून या कामासाठी नेमलेल्या दलालांपैकी गिरीश महाजन हे एक दलाल आहेत. राज्यातील सत्तेत बदल होईल, त्यावेळी पक्ष बदलणारे सर्वात पहिले गिरीश महाजन हे असतील, असा आरोप प शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

भाजप हा एकेकाळी पवित्र लोकांचा पक्ष होता. सध्या त्याची सूत्र भ्रष्ट, देशद्रोही लोक आणि ठेकेदार यांच्या हातात आहेत. भ्रष्टाचारी, देशद्रोही लोकांना एकत्र करून सध्याचा भाजप बनला आहे. या लोकांना बाजूला काढले तर तुमचा पक्ष आहे कुठे, असा सवाल राऊत यांनी भाजपला केला आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गिरीश महाजन यांच्या संपत्तीची चौकशी सुरू झाली होती. त्यावेळी महाजन पक्ष बदलण्यास तयार होते. मी राजकारण सोडतो. शांतपणे घरात बसतो, असे निरोप त्यांच्याकडून येत होते. महाजन हे अत्यंत डरपोक नेते आहेत, असा दावा राऊत यांनी केला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपविण्याची भाषा करणाऱ्या भाजपला लाज वाटली पाहिजे. राजकारणात तुम्ही कोण होतात? बाळासाहेबांच्या शिवसेनेने तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवले. त्यात शिवसेनेला बुडविण्याची भाषा तुम्ही करता? ही भाषा तुम्हाला घेऊन बुडणार आहे, असा इशाराही राऊत यांनी भाजपला दिला.

आजपर्यंत अनेक जण शिवसेनेत आले. अनेक जण बाहेर पडले. त्यांनी शिवसेना संपविण्याची भाषा केली. मात्र, शिवसेना संपली नाही. संपणारही नाही. गिरीश महाजन यांच्या दहा पिढ्या आल्या तरी देखील शिवसेना संपणार नाही, असेही राऊत म्हणाले.

शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याबद्दल योग्य वेळ आल्यावर आपण सांगू, असेही राऊत म्हणाले. दोन्ही पक्ष एकत्र येण्याविषयी पडद्यामागे काही चर्चा, घडामोडी सुरू असतील तरी देखील त्याबद्दलची माहिती उघड कशी करता येईल, असा सवालही राऊत यांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading