Thursday, October 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सरकारी नोकरदार महिलांनीही घेतला लाडक्या बहिणीचा लाभ

मुंबई: प्रतिनिधी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ शासकीय नोकरीत असलेल्या महिलांना घेता येणार नाही असा नियम असूनही शासकीय नोकर असलेल्या लाखो महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले आणि २ हजार ६५२ जणींच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे उघड झाले आहे. या महिला कर्मचाऱ्यांकडून हे पैसे वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शासकीय नोकरीत असलेल्या महिलांना लाडकी वहिनी योजनेचा लाभ घेता येणार नाही असा नियम असून देखील एक लाखाहून अधिक महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केला. त्यापैकी अनेक अर्ज पडताळणी मध्ये रद्द करण्यात आले. तरी देखील काही महिला सरकारी कर्मचारी या योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या.

या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने माहिती तंत्रज्ञान विभागाला एक लाख साठ हजार महिला कर्मचाऱ्यांची माहिती उपलब्ध करून दिली. या माहितीची तपासणी केली असता २ हजार ६५२ महिला सरकारी कर्मचारी या योजनेचा लाभ घेत असून त्यांच्या बँक खात्यात एकूण तीन कोटी 58 लाख रुपये जमा झाल्याचे उघडकीला आले आहे.

सरकारी नोकरीत असूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांकडून हे पैसे वसूल करण्यात येणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाकडून सर्व शासकीय कार्यालयांना त्यासंबंधीचे आदेश लवकरच जारी करण्यात येणार आहेत, असे वरिष्ठ सरकारी सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply