Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

राष्ट्रीय माध्यमे दिल्लीकेंद्रित झाल्याने प्रादेशिक विषयांकडे दुर्लक्ष – धन्या राजेंद्रन

पुणे – “मुद्रित, इलेक्ट्राॅनिक तसेच डिजिटल राष्ट्रीय माध्यमे दिल्लीकेंद्रित आहेत. त्यामुळे प्रादेशिक स्तरावरील महत्त्वाचे विषय राष्ट्रीय माध्यमांकडून दुर्लक्षित होतात, या वास्तवाकडे ज्येष्ठ माध्यमकर्मी धन्या राजेंद्रन यांनी शुक्रवारी येथे लक्ष वेधले. ‘परिणामी राष्ट्रीय पातळीवर प्रादेशिक मुद्दे पोहोचू शकत नाहीत’, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

‘ फ्रेंड्स ऑफ व्यंकटेश’ व ‘पुणे श्रमिक पत्रकार संघ’ यांच्या वतीने आयोजित व्यंकटेश चपळगांवकर स्मृती व्याख्यानामध्ये त्या बोलत होत्या. ‘भारतीय माध्यमांतला समकालीन दुभंग’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.  धन्या राजेंद्रन या ‘द न्यूज मिनिट’ या दक्षिण भारताशी संबंधित सुप्रसिद्ध न्यूज वेबसाईटच्या सहसंस्थापिका, संपादिका व प्रसिध्द पत्रकार आहेत. यावेळी पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रतिभा चंद्रन व्यासपीठावर उपस्थित होते.

धन्या राजेंद्रन यांनी माध्यमांमधील समकालीन दुभंगलेपणाच्या पाच अवस्था सांगितल्या. “प्रदेशनिष्ठता, विचारधारा, मालकी, डिजिटल माध्यमे आणि जातीयता, असे पाच दुभंग माध्यमांमध्ये दिसून येतात”, असे सांगून त्या म्हणाल्या, “माध्यमांमध्ये मुद्रित, वृत्तवाहिन्या व डिजिटल असे दुभंगलेपण असल्याने माध्यमांसंबंधी असलेल्या महत्त्वाच्या धोरणात्मक निश्चितीसारख्या प्रसंगीही सर्व प्रकारची माध्यमे एकत्रितपणे शासनासमोर येताना दिसत नाहीत.  माध्यमांमध्ये एकसंधता नसल्याने हे दुभंगलेपण वाढत जाते. विचारधारेतील भिन्नतेमुळेही माध्यमे एकमेकांपासून अंतर राखतात. माध्यमांची मालकी हा अतिशय गुंतागुंतीचा मुद्दा असतो. माध्यमांची मालकी राजकीय नेत्यांकडे किंवा मोठ्या उद्योगपतींकडे असल्याने, त्यांचे वैयक्तिक प्रभाव माध्यमांच्या कव्हरेजवर परिणाम करतात आणि निखळ पत्रकारिता बाजूला पडते. डिजिटल माध्यमांचे नवेपण अद्याप पुरेसे रुजलेले नाही. त्यामुळे डिजिटल माध्यमांकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले जाते का, हा कळीचा मुद्दा आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माध्यमांमधील जातीयतेचा मुद्दा दुभंगलेपण सदैव कायम ठेवण्यास हातभार लावत राहतो”.

माध्यमांचे दुभंगलेपण स्पष्ट करताना धन्या यांनी स्वतःच्या पत्रकारितेची समर्पक उदाहरणे देत विषय स्पष्ट केला. ‘मी एका राष्ट्रीय इंग्रजी वृत्तवाहिनीची चेन्नईमध्ये प्रतिनिधी म्हणून काम करताना मी पत्रकार नसून प्रादेशिक विषयांची मार्केटिंग ऐजंट आहे का? असा प्रश्न मला पडत असे. राज्य पातळीवरील ही बातमी खूप महत्वाची आहे ती आपणा घ्यायला हवी हे दिल्लीतील माझ्या वरिष्ठांना सांगताना माझी दमछाक होत असे. आयरलंड येथील एका गर्भवती भारतीय महिलेचा तेथील काही स्थानिक कायद्यांचा अडसर व त्यामुळे उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. या बातमीकडे मी माझ्या दिल्लीतील सहकार्यांचे लक्ष वेधण्याचे खूप प्रयत्न केले. परंतु त्यावेळी बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात असल्याने या बातमीकडे त्यांनी दुर्लक्ष केले. “राष्ट्रीय माध्यमांचा हा दुजाभाव अनुभवल्यानंतर मी स्वतःच्या डिजिटल माध्यमाकडे वळले”, असे त्या म्हणाल्या.

“राष्ट्रीय माध्यमे दिल्लीशिवाय इतरत्र घडणार्या महत्त्वाच्या घटना दुर्लक्षित करतात. एखादे हॅपनिंग अनावश्यक मोठे करून दाखवताना, वास्तवातील अनेक महत्त्वाचे विषय, घटना, अन्याय बाजूला ठेवले जातात. जम्मूकाश्मीर, मणिपूर या ठिकाणी नेमके काय सुरू आहे, याची माहिती महिनोंमहिने देशाच्या अन्य भागात समजत नाही. चुकीची माहिती आणि जाणीवपूर्वक पूर्वग्रहदूषित माहितीचा प्रसार, हे प्रकार वारंवार घडतात. माध्यमे विशिष्ट राजकीय नेते, पक्ष अथवा उद्योगसमूहांच्या मालकीची असल्याने ते ते प्रभाव अपरिहार्यपणे माध्यमांच्या वृत्तांकनात प्रतिबिंबित होतात. डिजिटल माध्यमांचा प्रसार मोठा असला तरी त्यांच्यावरील शासकीय नियंत्रण ही चिंतेची बाब आहे. भारतीय समाजव्यवस्थेचा भाग असणारी जातीयता, हे मोठे संकट माध्यमांनाही ग्रासून टाकत आहे”, याचा उल्लेख धन्या राजेंद्रन यांनी केला. या सर्व पार्श्वभूमीवरही समाजाला धाडसी, परखड पत्रकारितेची आवश्यकता आहे, त्यामुळे नव्या पिढीतील पत्रकारांनी माध्मयांच्या विश्वात अवश्य यावे आणि सकारात्मक, निर्भींड माध्यमकर्मी बनून एक सकारात्मक चित्र तयार करावे, असेही त्या म्हणाल्या.

मीनाक्षी गुरव यांनी आभार मानलेमयुरेश कोण्णूर यांनी सूत्रसंचालन केले तर प्रतिभा चंद्रन यांनी प्रास्ताविक केले व धन्या राजेन्द्रन परिचय करून दिला. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading