किर्लोस्कर इंडस्ट्रीजने आपले नेतृत्व आणखी मजबूत केले, जॉर्ज वर्गीस नवे व्यवस्थापकीय संचालक
पुणे : किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड (केआयएल) ने आज जाहीर केले की त्यांच्या संचालक मंडळाने २० मे, २०२५ रोजी झालेल्या बैठकीत श्री जॉर्ज वर्गीस यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. २१ मे २०२५ ते २० मे २०३० (दोन्ही दिवस समाविष्ट) या ५ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आलेली ही नियुक्ती भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन आहे.
यावर भाष्य करताना, संचालक मंडळाचे अध्यक्ष अतुल किर्लोस्कर म्हणाले, “किर्लोस्कर इंडस्ट्रीज परिवारात श्री जॉर्ज यांचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. श्री. जॉर्ज यांनी समूहातील विविध कंपन्यांसोबत काम केले आहे आणि त्यांना व्यवसाय धोरण, ऑपरेशनल एक्झिक्युशन, नेतृत्व, एचआर ट्रान्सफॉर्मेशन, मार्केटिंग आणि संस्कृतीचा सखोल अनुभव आहे, जो किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेडसाठी एक मोठी संपत्ती ठरेल.”
वर्गीस हे एक अनुभवी नेते आहेत. त्यांनी डेल, रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि कमिन्स सारख्या कंपन्यांमध्ये २० वर्षांहून अधिक काळ विविध नेतृत्व पदांवर काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी व्यवसाय संचालन, मानव संसाधन, व्यवसाय धोरण, विपणन आणि ब्रँडिंग यासह विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
वर्गीस एप्रिल २०२१ मध्ये किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये ग्रुप एचआरचे उपाध्यक्ष म्हणून सामील झाले. त्यानंतर ते किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडचेसीएचआरओ आणि चीफ ऑफ स्टाफ बनले, जिथे ते यशस्वी धोरणात्मक व्यवसाय परिवर्तनाच्या प्रयत्नांसाठी जबाबदार असलेल्या मुख्य टीमचा भाग होते. त्यांनी XLRI जमशेदपूर येथून व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली, त्यापूर्वी त्यांनी मुन्नार येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली.
