एमएसआयडीसीचे डॉ. ब्रिजेश दीक्षित यांची शिवसृष्टीला भेट
पुणे : महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे (एमएसआयडीसी) व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी नुकतीच आंबेगाव ब्रुद्रुक येथील शिवसृष्टीला भेट दिली. आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क असलेल्या, कै. पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि छ्त्रपती महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीतील विविध विभागांची यावेळी दीक्षित यांनी पाहणी केली.
शिवसृष्टीचे विश्वस्त जगदीश कदम यांनी डॉ. ब्रिजेश दीक्षित व नीता दीक्षित यांचा सत्कार केला. शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार, शिवसृष्टीतील कर्मचारी यांसोबतच एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय अभियंते संतोष बांपलवार, अनिल कुमार तिवारी, मंगेश ढोरण, रोहिदास पिसाळ, आशुतोष तिवारी, अशोक गोसावी, मुकंद सुर्वे आदी देखील उपस्थित होते.
या सर्व अधिकाऱ्यांनी यावेळी शिवसृष्टीमधील दुर्गवैभव’, ‘रणांगण’ ही दालने, महाराजांच्या आग्राहून सुटकेचा थरार उभा करणारे दालन, प्रत्यक्ष शिवराय आपल्याशी संवाद साधत असल्याचा अनुभव देणारे श्रीमंत योगी हे दालन, राज्याभिषेकाचा देखावा असलेला ‘सिंहासनाधिश्वर’ हे दालन यांना भेट दिली. छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी, त्यांना असलेला स्वभाषा, स्वराज्य आणि स्वधर्माचा अभिमान, त्यांच्यावर आलेली संकटे आणि या सर्वांवर मात करून त्यांनी उभारलेले स्वराज्य या सर्वांची माहिती शिवसृष्टीच्या माध्यमातून पाहताना अंगावर शहारे आल्याचे सर्वांनी सांगितले.
याबरोबरच शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्य आकर्षण असलेले टाइम मशीन थिएटर आणि महाराजांच्या काळात काढलेल्या व सध्या जगातील प्रसिद्ध संग्रहालयांमध्ये असलेल्या चित्रांच्या (पेंटिंग्ज) हाय रेझोल्युशन इमेजेसच्या प्रिंट्सही या सर्वांनी पाहिल्या. ‘लीडिंग फ्रॉम द फ्रंट’ अशी ख्याती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हयातीत खूप लढायांचे नेतृत्व केले. त्यातील आपल्याला फारशी माहिती नसलेल्या लढायांची माहिती घेताना जणू शिवकाल समोर उभा ठाकल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. छत्रपती घराण्याचे कुलदैवत असलेल्या तुळजा भवानी मातेचे मंदिर आणि गंगासागर तलाव याचे देखील दर्शन या सर्वांनी घेतले.
