मूल्यवर्धन कार्यक्रमाची तातडीने अंमलबजावणी करावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र शासन आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्यात महत्वपूर्ण सामंजस्य करार
मुंबई : शालेय विद्यार्थ्यांना मूल्याधारित शिक्षण मिळावे, यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत शालेय अभ्यासक्रमात ‘मूल्यवर्धन 3.0’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभाग व शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मूल्यवर्धन 3.0 हा उपक्रम अतिशय चांगला उपक्रम असून विद्यार्थ्यांवर त्याचा चांगला परिणाम होईल. त्यामुळे तातडीने या सामंजस्य कराराची अमंलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमास शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव सुजाता सौनिक, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, एससीईआरटीचे संचालक राहूल रेखावार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनचे ट्रस्टी वल्लभ भन्साली, संस्थापक शांतिलाल मुथ्था, पंचशील उद्योगसमूहाचे अध्यक्ष अतुल चोरडिया, एमडी कोमल जैन, सीईओ व्ही. व्यंकटरमणा, टी. जयराजन आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मूल्यशिक्षण हा विषय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. यापूर्वी २०१५-२० अशी सलग पाच वर्षे जिल्हा परिषदेच्या सर्व ६७ हजार प्राथमिक शाळांतील ४४ लाख विद्यार्थ्यांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम शासनाने यशस्वीपणे राबविला. तसेच शिक्षकांसाठी यासंबंधी दिलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांचा मोठा उत्साह दिसून आला होता. आता या उपक्रमात आणखी सुधारणा करून ‘मूल्यवर्धन 3.0’ हा उपक्रम राज्यात राबविण्यात येत असून त्यामुळे विद्यार्थी लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील व सक्षम नागरिक बनतील. या सामंजस्य कराराची अंमलबजावणी तातडीने करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘मूल्यवर्धनच्या माध्यमातून सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी, विद्यार्थी, पालक हे एकत्रितरित्या मिळून महाराष्ट्रामध्ये मूल्यशिक्षणाची शैक्षणिक क्रांती घडवतील आणि महाराष्ट्र हे देशात सर्वात पुढे राहील, यात शंका नाही,’ असा विश्वास श्री. शांतिलाल मुथ्था यांनी आपल्या सादरीकरणा दरम्यान व्यक्त केला.
मूल्यवर्धन 3.0 ची वैशिष्ट्ये
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन राज्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांपर्यंत मूल्यवर्धन कार्यक्रम पोहोचविणार
राज्यातील 1 लाख शाळांतील 5 लाख शिक्षकांच्या माध्यमातून एक कोटी विद्यार्थ्यांना मूल्याधारित शिक्षण मिळणार
राज्यात मूल्याधारित शिक्षणाची अधिकृत व व्यापक अंमलबजावणी या करारामुळे होणार आहे.
मूल्य शिक्षणाचा हा उपक्रम देशातील सर्वात मोठा उपक्रम असून तो दिशादर्शक ठरणार आहे.
मूल्यवर्धन उपक्रमाचे शिक्षकांच्या अध्ययन-अध्यापन पद्धतीत बदल, उपक्रम पुस्तिका आणि मूल्य आत्मसात करण्याची संधी हे तीन प्रमुख पैलू आहेत.
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडानुसार मूल्यवर्धन उपक्रमात आवश्यक बदल करण्यात आले आहेत.
राज्य अभ्यासक्रम आराखड्याशी सुसंगत उपक्रम
इयत्ता 1 ली ते 8 वी साठी नवीन उपक्रम पुस्तिका मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये अद्ययावत करण्यात आल्या आहेत.
